

५४३ वरून लोकसभेच्या ८५० जागा होणार?
परिसीमन विधेयकासाठी भाजपची प्रादेशिक पक्षांना मनधरणी
NDA चे बहुमताचे गणित कसे जुळणार?
Delimitation Bill 2026: संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी परिसीमन विधेयकावरून देशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महिला आरक्षणाची अंमलबजावणी आणि लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा मार्ग मोकळा करणारे संविधान दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.
मात्र, या विधेयकाला संसदेत दोन-तृतीयांश बहुमत मिळवणे हे सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA कडे सध्या सुमारे ३१९ खासदारांचे समर्थन असल्याचा राजकीय अंदाज आहे. त्यामुळे बहुमताचे गणित जुळवण्यासाठी सरकारला आणखी मतांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेत प्रत्येकी एक खासदार असलेले १६ छोटे पक्ष गेमचेंजर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या १६ पक्षांपैकी सहा पक्ष एप्रिलमध्ये NDA सोबत होते. पाच पक्ष इंडिया आघाडीच्या जवळ होते, तर उर्वरित पाच पक्ष कोणत्याही मोठ्या राजकीय आघाडीत सहभागी नव्हते. त्यामुळे या पक्षांची भूमिका विधेयकाच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते.
या गटामध्ये अपना दल (सोनेलाल), आसाम गण परिषद (AGP), आजसू पार्टी, हिंदुस्तानी अवाम मोर्चा (सेक्युलर), अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा (SKM) यांचा समावेश आहे. या सर्व पक्षांनी एप्रिलमध्ये सादर करण्यात आलेल्या परिसीमनाशी संबंधित संविधान दुरुस्ती विधेयकाला समर्थन दिले होते. मात्र, नव्या प्रस्तावाबाबत या पक्षांनी अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. विशेषतः ईशान्येकडील राज्यांमध्ये भौगोलिक परिस्थिती, सांस्कृतिक विविधता आणि लहान समुदायांचे राजकीय प्रतिनिधित्व हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यामुळे नव्या मसुद्यात या राज्यांच्या हितांचे संरक्षण कसे केले जाते, यावर या पक्षांची भूमिका अवलंबून राहू शकते.
भारत आदिवासी पार्टी, केरळ काँग्रेस, मरुमलार्ची द्रविड मुनेत्र कषगम (MDMK), राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी (RLP) आणि रिव्होल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी (RSP) हे पाच पक्ष इंडिया आघाडीच्या जवळ मानले जातात. या पक्षांची प्रमुख चिंता लोकसंख्येवर आधारित परिसीमनामुळे काही राज्यांचे आणि वंचित समुदायांचे राजकीय प्रतिनिधित्व कमी होण्याची आहे.
विशेषतः तामिळनाडूसारख्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यास अशा राज्यांचे संसदेमधील सापेक्ष प्रतिनिधित्व कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एमडीएमकेचे खासदार दुरई वायको यांनी यापूर्वीही परिसीमनाच्या प्रस्तावाला विरोध केला होता. तर हनुमान बेनीवाल आणि राजकुमार रोत यांनी या विषयावर सर्वपक्षीय चर्चा घेण्याची मागणी केली होती.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM), शिरोमणी अकाली दल (SAD), आझाद समाज पार्टी (कांशीराम), युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (UPPL) आणि जोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) हे पाच पक्ष कोणत्याही मोठ्या राष्ट्रीय आघाडीचा औपचारिक भाग नव्हते. यातील शिरोमणी अकाली दलाच्या भूमिकेत महत्त्वाचा बदल झाला आहे. २४ नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी २०२७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली. अकाली दल पुन्हा NDA मध्ये सहभागी झाल्याने पक्षाच्या एकमेव खासदार हरसिमरत कौर बादल यांचे मत महत्त्वाचे ठरू शकते.
दुसरीकडे, आझाद समाज पार्टी आणि AIMIM यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. ईशान्येकडील UPPL आणि ZPM या पक्षांसाठीही लहान राज्यांचे प्रतिनिधित्व आणि प्रादेशिक हितांचे संरक्षण महत्त्वाचे ठरणार आहे.
एप्रिलमध्ये लोकसभेत सादर करण्यात आलेल्या संविधान (१३१ वी दुरुस्ती) विधेयक २०२६ ला २९८ मते मिळाली होती, तर २३० खासदारांनी विरोधात मतदान केले होते. त्यावेळी ५२८ सदस्य मतदानासाठी उपस्थित होते. त्यामुळे दोन-तृतीयांश बहुमतासाठी ३५२ मतांची आवश्यकता होती. मात्र, सरकारला हा आकडा गाठता आला नव्हता. आता उपलब्ध राजकीय गणितानुसार, NDA ला सुमारे ३१९ मतांचे समर्थन मिळू शकते. त्यात बंडखोर तृणमूल काँग्रेस खासदार आणि अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांच्या संभाव्य समर्थनाचा समावेश असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
याशिवाय डीएमकेचे २२ खासदार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ८ खासदार आणि वायएसआर काँग्रेसचे ४ खासदार यांनी समर्थन दिल्यास सरकारची संख्या ३५३ पर्यंत पोहोचू शकते, असा राजकीय अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तामिळनाडूमधील डीएमके पक्षाने यापूर्वी लोकसंख्येवर आधारित परिसीमनाला विरोध केला होता. मात्र, राज्यातील लोकसभेच्या जागांचे प्रमाण सुरक्षित ठेवण्याबाबत केंद्र सरकारने लेखी हमी दिल्यास पक्ष आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करू शकतो, अशी चर्चा आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे लोकसभेत आठ खासदार आहेत. प्रत्येक राज्याच्या लोकसभेतील जागांमध्ये समान प्रमाणात ५० टक्के वाढ करण्याच्या अटीवर या पक्षाने समर्थनाचे संकेत दिल्याचे वृत्तात नमूद आहे. पक्षाने आपल्या खासदारांना ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत संसदेत उपस्थित राहण्यासाठी व्हिपही जारी केला आहे. त्यामुळे डीएमके आणि शरद पवार गटाची भूमिका केंद्र सरकारसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
प्रस्तावित परिसीमनाच्या चर्चेनुसार लोकसभेच्या सध्याच्या ५४३ जागा वाढवून कमाल ८५० पर्यंत करण्याचा पर्याय विचाराधीन आहे. प्रत्येक राज्याच्या विद्यमान जागांमध्ये समान प्रमाणात ५० टक्के वाढ करण्याचा फॉर्म्युलाही चर्चेत असल्याचे म्हटले आहे. दक्षिण भारतातील राज्यांची चिंता दूर करण्यासाठी १९७१ च्या जनगणनेतील लोकसंख्येचे प्रमाण कायम ठेवण्याचा पर्यायही चर्चेत आहे. मात्र, केंद्र सरकारने अद्याप या प्रस्तावाचा अंतिम मसुदा सार्वजनिक केलेला नाही.
संविधानाच्या अनुच्छेद ३६८ नुसार संविधान दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी दोन्ही सभागृहांमध्ये उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी किमान दोन-तृतीयांश सदस्यांचे समर्थन आवश्यक असते. त्यामुळे सभागृहातील प्रत्यक्ष उपस्थिती आणि मतदानाच्या वेळी असलेली सदस्यसंख्या यावर बहुमताचा अंतिम आकडा अवलंबून असतो.
याच कारणामुळे लोकसभेत केवळ एक-एक खासदार असलेल्या १६ पक्षांचे महत्त्व वाढले आहे. मोठ्या प्रादेशिक पक्षांसोबतच लहान राज्ये, आदिवासी समुदाय आणि प्रादेशिक प्रतिनिधित्वाच्या प्रश्नांवरही केंद्र सरकारला तोडगा काढावा लागणार आहे. परिसीमन विधेयकाचा अंतिम मसुदा समोर आल्यानंतरच या १६ पक्षांची नेमकी भूमिका स्पष्ट होईल. त्यामुळे आगामी संसदीय घडामोडींमध्ये या छोट्या पक्षांचा एक-एक खासदार सरकारच्या बहुमताचे गणित बदलणार का, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.