
एर्नाकुलम : केरळमधील एर्नाकुलम (Ernakulam Blast) येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रविवारी एकापाठोपाठ एक असे 5 भीषण बॉम्बस्फोट झाले. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कलामासेरीमध्ये असलेल्या या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सकाळी 9.30 च्या सुमारस ही घटना घडली.
कलामसेरी येथील एका कन्व्हेंशन सेंटरमध्ये ख्रिश्चन समाजाची प्रार्थना सभा सुरू होती. ही सभा सुरू असतानाच अचानक स्फोट झाल्याने एकच धावपळ उडाली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी तातडीने पावले उचलत घटनास्थळाला चारही बाजूने घेराव घातला. या ठिकाणी पोलीस छावणीचं स्वरुप आलं असून, अनेकांची कसून चौकशी केली जात आहे. संशयितांचीही विचारपूस केली जात आहे. या घटनेचं कारण शोधण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं आहे. ज्यावेळी हा स्फोट झाला तेव्हा प्रार्थना सभेला सुमारे 2 हजार लोक उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे.
एकापाठोपाठ एक असे 5 स्फोट
यहोवा विटनेस संघटनेचे स्थानिक प्रवक्ते टी. ए. श्रीकुमार यांनी सांगितले की, पावणे दहाच्या सुमारास प्रार्थना संपल्यानंतर काही सेकंदात सभागृहात तीन भीषण स्फोट झाले. पहिला स्फोट हॉलच्या मध्यभागी झाला. काही सेकंदांनंतर, हॉलच्या दोन्ही बाजूला आणखी दोन स्फोट झाले. एर्नाकुलममध्ये ज्या भागात स्फोट झाला, त्या परिसरात मोठ्या संख्येने ज्यू समुदायाचे लोक राहतात.