डेहराडून – योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या पतंजली ग्रुपच्या (Patanjali Group) पाच औषधांच्या उत्पादनावर उत्तराखंड (Uttarakhand) सरकारने बंदी घातली आहे. ही औषधे दिव्या फार्मसीद्वारे (Divya Pharmacy) उत्पादित केली जातात. उत्तराखंडच्या आयुर्वेद (Ayurved) आणि युनानी (Yunani) परवाना प्राधिकरणाच्या मते, या औषधांची जाहिरात दिशाभूल करणारी आहे. मात्र, अशा कोणत्याही आदेशाची प्रत आपल्याला अद्याप मिळाली नाही. औषधांवर बंदी घालण्यामागे आयुर्वेदविरोधी औषध माफियांचे कारस्थान असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला.
केरळमधील डॉक्टर केव्ही बाबू यांनी जुलैमध्ये तक्रार केली होती. त्यांनी पतंजलीच्या दिव्या फार्मसीच्या वतीने ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहिरात) कायदा १९५४, ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट १९४० आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स नियम १९४५ चे वारंवार उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. बाबू यांनी ११ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा ही तक्रार राज्य परवाना प्राधिकरणाकडे ईमेलद्वारे पाठवली होती.
बंदीचा आदेश उत्तराखंड आयुर्वेदिक आणि युनानी सेवांचे परवाना अधिकारी डॉ. जीसीएस जंगपांगी यांनी जारी केला होता. त्यांनी पतंजलीवर दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचा आरोप केला. नंतर अनेक माध्यमांनी ही बातमी प्रसिद्ध केली होती. प्राधिकरणाने रक्तदाब, मधुमेह, गलगंड, काचबिंदू आणि उच्च कोलेस्टेरॉलवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या औषधांवर बंदी घातली आहे. बीपी ग्रिट, मधुग्रिट, थायरोग्रिट, लिपिडोम आणि आयग्रिट गोल्ड अशी त्यांची नावे आहेत.