नटवर सिंह यांचे निधन
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माजी मंत्री नटवर सिंह हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचारही सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मावळली.
हेदेखील वाचा : ‘हर घर तिरंगा मोहीम’ला सुरूवात; मोहिमेत सहभागी होण्याचे भारतीयांना पंतप्रधानांचे आवाहन
नटवर सिंह यांचे देशाच्या राजकारणात खूप मोठं योगदान आहे. नटवर सिंग यांनी 2004-05 दरम्यान UPA-I सरकारमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले. या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग होते. त्यांनी पाकिस्तानचे राजदूत म्हणूनही काम केले आणि 1966 ते 1971 या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यालयात ते संलग्न होते. तसेच 1953 मध्ये त्यांची भारतीय परराष्ट्र सेवेसाठी निवड झाली होती. यादरम्यान त्यांनी चीन, न्यूयॉर्क, पोलंड, इंग्लंड, पाकिस्तान, जमैका आणि झांबियासह अनेक देशांमध्ये सेवादेखील दिली होती.
1984 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश
नटवर सिंह यांनी 1984 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली आणि राजस्थानच्या भरतपूरमधून खासदार म्हणून निवडून आले होते. 2004 मध्ये, त्यांना UPA-I सरकारमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते, पण नंतर, ‘ऑयल फॉर फूड’ घोटाळ्यात त्यांचे नाव समोर आल्याने त्यांना 2005 मध्ये पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
हेदेखील वाचा : विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केले चक्क पंतप्रधान मोदींचे कौतुक; नेमकं कारण काय?
1984 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित
भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मभूषण पुरस्काराने नटवर सिंह यांना 1984 मध्ये सन्मानित करण्यात आले होते. नटवर सिंह यांनी अनेक पुस्तके लिहिल्या आहेत. त्यांचे ‘वन लाइफ इज नॉट इनफ’ हे आत्मचरित्र खूप लोकप्रिय आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांचे जीवन आणि राजकीय अनुभव याबद्दल सविस्तर लिहिले आहे.