Gautam Adani: गौतम अदाणी छत्तीसगडमध्ये करणार तब्बल 65 हजार कोटींची गुंतवणूक; 'या' क्षेत्रात निर्माण होणार रोजगाराच्या संधी
रायपूर: देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय यांची भेट घेतली. ही भेट छत्तीसगड राज्यात अधिकाधिक गुंतवणूक व्हावी आणि राज्याची प्रगती व्हावी यासाठी होती. या भेटीत उद्योगपती गौतम अदाणी यांनी छत्तीसगडमध्ये तब्बल 65 हजार कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक राज्यातील ऊर्जा आणि सीमेंट प्रकल्पात केली जाणार आहे. राज्याच्या जनसंपर्क विभागाने याबद्दल माहिती दिली आहे.
राज्याच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्योगपती गौतम अदाणी यांनी मुख्यमंत्री विष्णु देव साय यांची रायपूर येथील निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान गौतम अदाणी यांनी रायपूर, कोरबा आणि रायगड या ठिकाणी विजेच्या प्लांटचा विस्तार करण्यासाठी 60 हजार कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. अदाणी समूहाने विजेच्या प्लांटमध्ये 60 हजार कोटींची गुंतवणूक केल्याने छत्तीसगडमध्ये विजेची एकूण क्षमता 6,120 मेगावॅट इतकी होणार आहे.
In a meeting with the Honourable Chief Minister of Chhattisgarh, Shri Vishnu Deo Sai, Gautam Adani, Chairman of the Adani Group, announced a planned investment of ₹60,000 crore to expand the group’s power plants in Raipur, Korba, and Raigarh. This expansion will enhance… pic.twitter.com/5mz6NgqxOA
— CMO Chhattisgarh (@ChhattisgarhCMO) January 12, 2025
यासोबतच गौतम अदाणी यांनी सीमेंट आणि ऊर्जा भागात 5 हजार कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीत अदाणी यांनी पुढील चार वर्षांत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत शिक्षण, आरोग्यसेवा, कौशल्य विकास आणि पर्यटन क्षेत्रात देखील गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. संरक्षण संबंधित उपकरणांसाठी उत्पादन आणि डेटा सेंटर्स स्थापन करण्यासंदर्भात देखील मुख्यमंत्री विष्णु देव साय आणि गौतम अदाणी यांच्यात चर्चा झाली आहे.
अदाणींना मिळणार रू. 1,71,39,85,00,000 रकमेचा चेक
देशातील तिसरे सर्वात मोठे औद्योगिक घराणे असलेल्या अदानी समूहाने अदानी विल्मारमधील आपला हिस्सा विकण्याची घोषणा केली आहे. यातून समूहाला सुमारे 2 अब्ज डॉलर्स म्हणजेच 1,71,39,85,00,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. हिंदू बिझनेसलाइनने दिलेल्या वृत्तानुसार, अदानी समूह आपल्या तीन प्रकल्पांमध्ये ही रक्कम गुंतवेल. यामध्ये विमानतळ, ग्रीन हायड्रोजन आणि नवीन प्रकल्प यांचा समावेश आहे. यातील मोठा हिस्सा विमानतळ व्यवसायात गुंतवला जाऊ शकतो असेही या वृत्तातून सांगण्यात आले आहे. समूहाने रिफायनरी, पेट्रोकेमिकल आणि केमिकल व्यवसायात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी थाई कंपनी इंडोरामासोबत संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे.
हेही वाचा: अडानीला मिळणार रू. 1,71,39,85,00,000 रकमेचा चेक, कुठे करणार खर्च; यादीही तयार
काय आहे अदाणी समूहाची योजना
अदानी समुहाचे म्हणणे आहे की ते आपल्या मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रित करू इच्छित आहेत आणि नॉन-कोअर व्यवसायातून बाहेर पडू इच्छित आहेत. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स अनेक विमानतळ अपग्रेड करत आहे. नवी मुंबई विमानतळही यावर्षी सुरू होण्याची शक्यता आहे, जे अदानी समूहाद्वारे तयार करण्यात आले आहे.
विमानतळांच्या विस्तारासाठी काही निधी राखून ठेवण्यात आला आहे तर काही रक्कम नवीन विमानतळ ताब्यात घेण्यासाठी गुंतवण्यात येणार आहे. अदानी न्यू इंडस्ट्रीज ग्रीन हायड्रोजनमध्ये गुंतवणूक करत आहे. 2027 पर्यंत 1 दशलक्ष टन वार्षिक क्षमता गाठण्याचे त्याचे लक्ष्य आहे असे सध्या समोर येत आहे.