गोरखपूर : पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या होमगार्ड विवेकानंद सिंह (Vivekanand Singh) यांना आपलं नशीब एका रात्रीतून बदलणार आहे, याची साधी पुसटशी कल्पनाही नव्हती. 4 तासांपूर्वी पोलीस ठाण्यात जेव्हा विवेकानंद झोपायला जात होते, त्यावेळी त्यांचं जीवन सर्वसाधारण पोलिसांसारखं होतं. रात्री 12 वाजता उठून जेव्हा त्यांनी मोबाईल चेक केला, त्यावेळी मोबाईलवर आलेल्या काही मेसेजेसमुळं त्यांचं आयुष्यच पालटून गेलं. नशीब उघडलं आणि त्या मेसेजमुळं रात्रीतून विवेकानंद हे कोट्यधीश झालेत. ते केवळ कोट्यधीशच झाले नाहीत तर त्याचबरोबर एक लक्झरी कारही त्यांना मिळालीय.
अर्ध्या रात्रीतून होमगार्ड झाला कोट्यधीश
गोरखपूरच्या सिकरीगंज पोलीस ठाण्यात तैनात असलेले होमगार्ज विवेकानंद हे पिपरीचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडे गाडी चालवण्याचं काम आहे. नुकताच त्यांना आयपीएल मॅचसाठी ऑनलाईन ऍपवर प्लेअर्सवर पैसे लावण्याचा छंद जडला होता. गेल्या 6 महिन्यांपासून विवेकानंद हे करीत होते. सोमवारी रात्री चैन्नई विरुद्ध लखनौच्या मॅचमध्ये विवेकानंद यांनी 49 रुपये प्लेअर्सवर लावले आणि ते झोपी गेले होते. रात्री 12 च्या सुनमारास जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा ते कोट्यधीश झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मोबाईलवर एक कोटी रुपये आणि लक्झरी कार जिंकल्याचा मेसेज त्यांना आला होता.
70 लाख बँकेत, नोकरी सोडणार नाहीत
इतक्यावरच हे प्रकरण थांबलं नाही. काही वेळातच त्यांच्या अकाऊंटला 70 लाख रुपये जमाही झाले. इतकी मोठी लॉटरी लागल्यानंतरही आपली नोकरी सोडणार नाही, हेही विवेकानंद यांनी स्पष्ट केलं आहे. या लॉटरीनंतर त्यांना अभिनंदनासाठी अनेकांचे फोन आले. त्यात नातेवाईकांचाही मोठा सहभाग होता. इतकंच काय तर आयजी ऑफिसमधूनही फोन करुन त्यांचं अभिनंदन करण्यात आलंय. या पैशांतून जमीन किंवा घर खरेदी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. शेतीसाठी आणि भविष्यासाठी काही पैसे वाचवून ठेवणार असल्याचंही विवेकानंद यांनी सांगितलंय.
मुलांकडे पाहून शिकले होते
विवेकानंद सुट्टीच्या वेळी घरी जात असत. त्यावेळी लहान लहान मुलं ऑनलाईन ऍपवरुन पैसे लावतात आणि टीम तयार करतात, हे त्यांनी पाहिलं होतं. यातूनच टाईमपास म्हणून त्यांनीही टीम तयार करु, पैसे लावण्यास सुरुवात केली. गेल्या 6 महिन्यांपासून दररोज ते 150 रुपये गेमवर लावीत असत. सोमवारी मात्र त्यांनी 49 रुपयेच लावले होते. त्यातूनच ते कोट्यधीश झालेत.