हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तीव्र टीका करताना लष्करी संघर्ष, राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणावर अनेक सवाल उपस्थित केले. हैदराबाद येथे झालेल्या ‘जय हिंद’ रॅलीदरम्यान त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत “पाकिस्तानने अलीकडील लष्करी संघर्षात किती राफेल विमाने पाडली?” असा थेट सवाल केला. “सिकंदराबाद छावणीतील सैनिक युद्धात सहभागी झाले होते. तेलंगणात तयार झालेल्या लढाऊ विमानांनी देशाचा सन्मान राखला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणलेली राफेल विमाने पाकिस्तानने पाडली. यावर कुठलीही चर्चा होत नाही. १४० कोटी भारतीयांना याचा हिशोब दिला पाहिजे.” असही त्यांनी स्पष्ट केलं.
त्यांनी असा आरोप केला की, राफेल व्यवहारातील हजारो कोटी रुपयांची कंत्राटे मोदींच्या निकटवर्तीयांना देण्यात आली. याचप्रसंगी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाने कायम राष्ट्रहिताचा विचार केला असल्याचे सांगितले. “मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मीनाक्षी नटराजन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, राष्ट्रहिताच्या बाबतीत सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत. म्हणूनच काँग्रेसने एनडीए सरकारला पाकिस्तानसोबतच्या युद्धात पाठिंबा दिला होता,” असे रेड्डींनी नमुद केले.
पंतप्रधान इंदिरा गांधींचा उल्लेख करत रेड्डी म्हणाले की, “१९६७ मध्ये त्यांनी चीनला पराभूत केले, तर १९७१ मध्ये अमेरिकेच्या दबावाला न जुमानता बांगलादेश निर्माण केला.”पण मोदींचे नेतृत्व शेजारी देशांच्या आक्रमकतेला थोपवण्यात अपयशी ठरले आहे. जर राहुल गांधी पंतप्रधान असते, तर त्यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) भारतात परत आणले असते. असा घणाघातही त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले की, “मोदी हे १००० रुपयांच्या रद्द झालेल्या नोटेसारखे आहेत. देशाला राहुल गांधीसारखा नेता हवा आहे. मोदी कधीही युद्ध जिंकू शकत नाहीत,” अशी टीका त्यांनी केली. चार दिवसांच्या युद्धानंतर कोण जिंकले आणि कोण हरले, याबद्दल सरकारने स्पष्टीकरण द्यावे. त्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत म्हटले, “ट्रम्प यांनी सांगितले की त्यांनी भारतावर दबाव टाकून युद्ध थांबवले. मग खरे काय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आई-मुलाच्या नात्यात मैत्री शोधणारं ‘सखी माझी आई’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला…
त्यांनी बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे करण्यात आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) ताब्यात घेण्यात अपयश पत्करले. “१४० कोटी भारतीयांच्या इच्छेला न जुमानता, पंतप्रधानांनी अर्धवट निर्णय घेतले,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला. चार दिवसांच्या युद्धानंतर कोणाने कोणाला धमकावले, हे समजले नाही. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, त्यांनी हस्तक्षेप करून युद्ध थांबवले.” मोदींच्या ‘युद्ध म्हणजे भाषण नव्हे’ या विधानाचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, “१४० कोटी भारतीयांच्या आत्मसन्मानाची आपण शपथ घेतली, मग युद्ध थांबवून आपण तो सन्मान जपला का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.