नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालाची (Lok Sabha Elections Result 2024) उत्सुकता ताणली गेली होती. या निवडणुकीची मंगळवारी मतमोजणी झाली. त्यानंतर भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यानुसारच, आता त्यांच्याकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. एनडीएने आपल्या घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.
राजधानी दिल्लीत होणार एनडीएच्या या बैठकीत अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर सत्तास्थापनेसाठी पुढील रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीला एनडीएचे घटक पक्षातील नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार हे या बैठकीला जाणार नसल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, भाजपच्या सर्व विजयी खासदारांच्या व्यतिरिक्त घटक पक्षांच्या खासदारांनाही आज दिल्लीत येण्याच्या सूचना देण्यात आल्यात. अजित पवार जरी उपस्थित राहणार नसले तरी त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल हे या बैठकीला हजर राहणार असल्याची माहिती दिली जात आहे.