पहलगाम हल्ल्यानंतर भारत आक्रमक; सैनदलेही सज्ज, आता काहीतरी मोठं घडणार?
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे नुकताच दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारत मोठी प्रत्युत्तरात्मक कारवाई करेल हे निश्चित मानले जाते. या कारवाईमुळे युद्धबंदी करार रद्द होऊ शकतो, असा अंदाज देशाच्या तिन्ही सैन्यांच्या तयारीवरून लावला जात आहे. शुक्रवारी पाकिस्तानी सीमेवर नौदल आणि हवाई दलाच्या हालचालींमध्ये अचानक वाढ झाली. या दिवशी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी पहिल्यांदाच श्रीनगरला पोहोचले. येथे त्यांनी लष्कराच्या 15 व्या कॉप्स कमांडरसोबत बैठक घेतली आणि लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची भेट घेतली.
एक दिवस आधी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी नागपूरमधील देखभाल मुख्यालयाला भेट दिली होती. त्याच वेळी, भारतीय नौदलाने पश्चिम सागरी क्षेत्रात मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक आयएनएस सुरत वरून मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हवाई दलाने मध्यवर्ती भागात राफेल आणि सुखोई-३० लढाऊ विमानांसह ‘आक्रान’ सराव सुरू केला.
याअंतर्गत, टेकडी आणि जमिनीवरील लक्ष्यांवर हवाई हल्ले केले जात आहेत. या सर्व उपक्रमांमुळे काही मोठ्या तयारीचे संकेत मिळत आहेत. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी शुक्रवारी श्रीनगरला पोहोचले. येथे लष्कराच्या कमांडर्सनी जनरल द्विवेदी यांना सध्याची परिस्थिती आणि दहशतवादाविरुद्ध सैन्याने उचललेल्या पावलांची माहिती दिली. लष्करप्रमुखांना नियंत्रण रेषेवरील सद्यस्थितीची माहितीही देण्यात आली.
वैमानिकांचा प्रत्यक्ष लढाऊ परिस्थितीत सराव
हवाई दलाची उपकरणे पूर्वमधून मध्य सेक्टरमध्ये पाठवण्यात आली आहेत. या सरावात, वैमानिक प्रत्यक्ष लढाऊ परिस्थितीत सराव करत आहेत, जेणेकरून त्यांना युद्ध परिस्थितीचा अनुभव घेता येईल. हा सराव हवाई दलाच्या दोन स्क्वॉड्रनच्या नेतृत्वाखाली आयोजित केला जात असून सुखोई एसयू-३० त्यात समाविष्ट आहे.