Vice President Election : फक्त सत्ताधारीच नाहीतर विरोधकांकडूनही जोरदार तयारी; सुशील कुमार शिंदेंसह 'ही' नावं चर्चेत
नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा नुकताच दिला. त्यांच्या या राजीनाम्यानंतर आता निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. आयोगाने बुधवारी ही माहिती दिली. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीशी संबंधित तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार, सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसह (NDA) इंडिया आघाडीकडूनही तयारी सुरु आहे. अनेक नेतेमंडळींची नावे समोर येत आहेत.
भाजपच्या अंतर्गत गोटात देखील काही वरिष्ठ नेत्यांची नावे पुढे येत आहेत. यात जे.पी. नड्डा, निर्मला सीतारमण, नितीन गडकरी, मनोज सिन्हा आणि वसुंधरा राजे यांचा समावेश आहे. मात्र, या कोणत्याही नावामध्ये सर्व राजकीय समीकरणे संतुलित करण्याची क्षमता दिसून येत नसल्याची चर्चा आहे. मार्च 2025 मध्ये जे. पी. नड्डा यांचा भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध त्यांना एक संभाव्य उमेदवार बनवतात. मनोज सिन्हा यांचे नाव देखील झपाट्याने पुढे येत असले, तरी जातीय समीकरण त्यांच्या बाजूने नसल्याचे बोलले जाते.
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे देशाच्या नवीन उपराष्ट्रपतींबद्दल गदारोळ सुरू आहे. असे असताना विरोधी इंडिया आघाडीनेही याबाबत प्रयत्न सुरू केले आहेत. इंडिया आघाडीच्या पक्षांनी यावर चर्चा सुरू केली आहे. त्यांच्याकडून चार नावांचा विचार केला जात आहे. यामध्ये सुशील कुमार शिंदे, शरद पवार, फारुख अब्दुल्ला आणि लालू प्रसाद यांची नावे समाविष्ट आहेत. या सर्व नावांचे स्वतःचे महत्त्व आहे.