INDIA Alliance Meeting for Vice Presidential Election 2025 rahul Gandhi Mallikarjun Kharge
Vice Presidential Election 2025 : नवी दिल्ली : दिल्लीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे मतचोरीच्या आरोपांनी रान पेटले असून दुसरीकडे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. जगदीप धनखड यांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी अचानकपणे राजीनामा दिला. यानंतर एनडीएकडून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने यावेळी देखील धक्कातंत्र वापरत चर्चेत असणाऱ्या नावांपेक्षा दुसरेच नाव जाहीर केले. यानंतर आता इंडिया आघाडीमध्ये देखील उपराष्ट्रपती पदासाठी हालचाली सुरु असल्याचे दिसत आहे.
देशातील विरोधकांची आघाडी असलेल्या इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीमध्ये पार पडत आहे. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडत आहे. इंडिया आघाडीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याचे अनेक अंदाज लावले जात आहे. आज होणाऱ्या बैठकीमध्ये या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये कोणाला उमेदवारी देणार आणि सी पी राधाकृष्णन यांच्यासमोर कोणाचे आव्हान असणार याची सर्वांना उत्सुकता असणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल असले तरी आमचा पक्ष त्यांना पाठिंबा का देईल? सीपी राधाकृष्णन हे निश्चितच महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, एक अतिशय संतुलित व्यक्तिमत्व आहे. जर महाराष्ट्राचे राज्यपाल उपराष्ट्रपती झाले तर आम्हाला आनंद होईल, पण निवडणूक होईल. वादग्रस्त नसलेले व्यक्ती आहेत. त्यांना भरपूर अनुभव आहे. मात्र उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत इंडिया अलायन्स निर्णय घेईल, तो निर्णय काय असेल हे मी सांगू शकत नाही, परंतु आज आपण त्यावर चर्चा करू आणि निर्णय घेऊ, अशी भूमिका खासदार संजय राऊत यांनी मांडली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. २१ ऑगस्ट ही नामांकनाची शेवटची तारीख आहे. तर नामांकनांची छाननी 22 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख ही 25 ऑगस्ट 2025 असणार आहे. तर 9 तारखेला मतदान झाल्यानंतर मतमोजणी करुन निकाल हाती येणार आहे. देशाच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही जोरदार चर्चेचा विषय ठरली असून कोण हे पद मिळवणारे याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.