Jammu Kashmir Terror Attack: जम्मू आणि काश्मीरच्या भूमीवर पुन्हा एकदा दहशतवादाने थैमान घातले आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वृत्तानुसार, या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या टीआरएफ म्हणजेच ‘द रेझिस्टंट्स फ्रंट’ ने घेतली आहे. या हल्ल्यामागील सूत्रधारही उघड झाला आहे.
तर, लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्ला खालिद हा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. त्याला सैफुल्लाह कसुरी म्हणूनही ओळखले जाते. कसुरी हा भारताचा सर्वात मोठा शत्रू हाफिज सईदचा जवळचा मानला जातो. भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचे नाव आले आहे. त्याला आलिशान गाड्यांचा शौक आहे आणि तो नेहमीच आधुनिक शस्त्रांस्त्रानी सज्ज असलेल्या लोकांसोबत फिरतो.
J&K attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याने जग हादरले, 26 निष्पापांचा मृत्यू, आंतरराष्ट्रीय निषेध
मिळालेल्या माहितीनुसार, सैफुल्ला खालिदचा पाकिस्तानात मोठा प्रभाव आहे आणि पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांकडून त्याला रसद पुरवली जाते. खालिदने अनेकदा पाकिस्तानी लष्कराच्या सैनिकांनासमोरही चिथावणी भाषणे करत असल्याची महिती आहे. तसेच, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या सुमारे दोन महिने आधी, सैफुल्ला खालिद पाकिस्तानातील पंजाबमधील कंगनपूरला पोहोचला होता. पाकिस्तानी सैन्याची एक मोठी बटालियन येथे राहते.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी संध्याकाळी सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पहलगाममध्ये दाखल झाले. जम्मू आणि काश्मीरचे पोलिस महासंचालक नलिन प्रभात यांनी गृहमंत्र्यांना घटनाक्रमाची माहिती दिली. त्यानंतर, शाह यांनी लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांसह सुरक्षा अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली.
‘अशी क्रूरता पाहणे भयानक…’, ‘हे’ सुप्रसिद्ध साऊथ अभिनेते पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर झाले भावुक!
पहलगाम शहरापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरनमध्ये घनदाट पाइन जंगले आणि पर्वतांनी वेढलेले एक विस्तीर्ण गवताळ प्रदेश आहे आणि ते पर्यटक आणि ट्रेकर्सचे आवडते ठिकाण आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, सशस्त्र दहशतवादी ‘मिनी स्वित्झर्लंड’ नावाच्या गवताळ प्रदेशात घुसले आणि त्यांनी रेस्टॉरंट्समध्ये फिरणाऱ्या आणि पिकनिक करणाऱ्या पर्यटकांवर गोळीबार सुरू केला.