
Karnataka Politics: कर्नाटक काँग्रेस सरकारमधून एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. कर्नाटकमध्ये नेतृत्व बदलाचा मुद्दा जोर धरू लागला आहे. उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन होण्याचा अंदाज लावला जात आहे. या महिन्याच्या २१ किंवा २६ तारखेला डी.के. शिवकुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्याच्या सिद्धरामय्या सरकारचा अडीच वर्षांचा कार्यकाळ २० नोव्हेंबर रोजी संपत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, डी.के शिवकुमार २१ किंवा २६ तारखेला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात अशी अटकळ बांधली जात आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आता या मुद्द्यावर एक निवेदन जारी केले आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना यासंबंधी प्रश्न विचारला असता सिद्धरामय्या काहीसे चिडलेले दिसले. “तुम्हाला हे कोणी सांगितले? शिवकुमार यांनी तुम्हाला हे सांगितले का?” असा उलट सवालही त्यांनी विचारला. आम्ही वर्तमान पत्रात या बातम्या वाचल्या असे पत्रकाराने सांगताच सिद्धारामय्या म्हणाले, “तुम्हाला वर्तमानपत्रात कसे दिसेल? कोणते वर्तमानपत्र? मी अशा कोणत्याही वर्तमानपत्रात अशी बातमी वाचली नाही.” असं त्यांनी जरा रागातच सांगितले.
दरम्यान, या महिन्यात कर्नाटकात काँग्रेस सरकारचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे संभाव्य नेतृत्व बदलाबद्दलच्या अटकळींना उधाण आले आहे. राजकीय वर्तुळांत या घडामोडींना “नोव्हेंबर क्रांती” असे नाव दिले जात आहे. मे २०२३ मधील विधानसभा निवडणुकीनंतर सर्वोच्च पदासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यात तीव्र स्पर्धा पाहायला मिळाली होती. अखेर काँग्रेस हायकमांडने शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास राजी केले. सिद्धरामय्या अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहतील आणि उर्वरित अडीच वर्षांसाठी शिवकुमार यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, काँग्रेस पक्षाने या ‘रोटेशन फॉर्म्युला’ची अधिकृत पुष्टी कधीच केली नाही.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गटातील आणखी एक महत्त्वाचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री बी. झेड. जमीर अहमद खान यांनीदेखील यावर स्पष्टीकरण दिले आहे. ” सिद्धरामय्या २०२८ पर्यंत मुख्यमंत्री राहतील. तसेच, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या आकांक्षा २०२८ नंतर बाळगाव्यात,” असे आवाहन त्यांनी केले.
जमीर म्हणाले, “सिद्धरामय्या २०२८ पर्यंत मुख्यमंत्री राहणार आहेत. शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून ते भाजपमध्ये जाणार, ही शक्यता नाही. काँग्रेस त्यांच्या रक्तात आहे. मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा स्वाभाविक आहे, जशी इतर अनेक नेत्यांची असते. सिद्धरामय्या यांच्यानंतर शिवकुमार मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंदच होईल, परंतु २०२८ पर्यंत हे पद रिक्त नाही.”
दरम्यान, दलित मुख्यमंत्र्यांच्या मागणी संदर्भात काँग्रेस नेते महादेवप्पा म्हणाले की, “काँग्रेस हायकमांड परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आमचे आंदोलन सुरू आहे, मात्र अंतिम निर्णय हायकमांडचाच असेल. कोणीही असे म्हणत नाही की दलित मुख्यमंत्री होऊ शकत नाही. काँग्रेस नेहमीच दलितांच्या बाजूने उभी आहे. दलित आणि अस्पृश्यच त्यांच्या वेदना समजू शकतात.”