छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; 6 नक्षलवाद्यांचा खात्मा
नवी दिल्ली : छत्तीसगडमधील नारायणपूर आणि दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यादरम्यान दोन्ही बाजूंनी गोळीबार केला जात होता. त्यात एसटीएफ, डीआरजी कोब्रा आणि नारायणपूर टीमच्या संयुक्त कारवाईत सहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर काही जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एका नक्षल्याचा मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नारायणपूर आणि दंतेवाडा सीमेवरील पूर्व बस्तर परिसरात ही चकमक झाली. दंतेवाडा एसपी गौरव रॉय यांनी सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईला दुजोरा दिला. नारायणपूर आणि दंतेवाडा सीमेवर चकमकीत आतापर्यंत ६ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे. या चकमकीत आणखी अनेक नक्षलवादी गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, छत्तीसगडमधील नक्षलविरोधी या कारवाईत, रामधरची पत्नी बिमला मारली गेल्याचा दावा करण्यात येत आहे. बिमला ही प्लाटून क्रमांक १० ची सदस्य होती. सुरक्षा दलांनी पूर्व पूर्व बस्तर विभागाला वेढा घातला आहे. पोलिस जंगलात शोधमोहीम राबवित होते. त्यादरम्यान ही कारवाई करण्यात आली. या कारवाईअंतर्गत केंद्र आणि राज्याकडून सतत मोहिमा चालवल्या जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संपूर्ण देशातून नक्षलवाद संपवण्यासाठी सुरक्षा दलांना योग्य त्या सूचनाही दिल्या आहेत.
सुकमा येथे 18 नक्षलवाद्यांनी केलं होतं समर्पण
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच 18 नक्षलवाद्यांनी सैन्यासमोर आत्मसमर्पण केले होते. याबाबतची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतः दिली होती. ज्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले अशा 11 नक्षलवाद्यांना एकूण 39 लाख रुपयांचे बक्षीस आहे. अशाप्रकारे समर्पण केल्याने पोलिसांच्या कारवाईला मोठं यश मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.