Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आज येणार; तब्बल 17 वर्षांनंतर न्याय मिळण्याची आशा (फोटो सौजन्य-X)
मुंबई : देशात आत्तापर्यंत अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या दहशतवादी घटनांपैकी एक असलेल्या २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आता येण्याची शक्यता आहे. तब्बल १७ वर्षांनंतर हा निकाल येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी न्या. ए.के. लाहोटी विशेष न्यायालयात आपला निकाल सुनावू शकतात, अशी माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात, भाजपच्या माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि दहशतवाद विरोधी कायद्यानुसार (यूएपीए) खून, गुन्हेगारी कट रचणे असे गंभीर आरोप आहेत. २९ सप्टेंबर २००८ रोजी, रमजानच्या काळात, महाराष्ट्रातील मालेगावमधील भिकू चौकातील मशिदीजवळ मोटारसायकलमध्ये ठेवलेल्या बॉम्बस्फोटामुळे दहशत निर्माण झाली होती. या स्फोटात ६ जण ठार झाले आणि १०० हून अधिक जण जखमी झाले. स्फोट इतका शक्तिशाली होता की, जवळच्या दुकाने आणि घरांचे नुकसान झाले होते.
हेदेखील वाचा : Operation Sindoor: “ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही बिर्याणी…”; जे.पी. नड्डा कडाडले, काँग्रेसवर सडकून टीका
महाराष्ट्रातील मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल १७ वर्षांनंतर आज येऊ शकतो. या प्रकरणातील निकाल आज एनआयएच्या विशेष न्यायालयाकडून जाहीर केला जाऊ शकतो. या प्रकरणातील मुख्य आरोपी भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर आहेत. साध्वी यांच्या व्यतिरिक्त, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितसह ७ आरोपी आहेत, ज्यांच्यावर दहशतवादी कट रचणे, खून करणे, धार्मिक तेढ पसरवणे असे आरोप आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सुमारे १७ वर्षांपूर्वी, २९ सप्टेंबर २००८ रोजी, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. रमजानमध्ये लोक नमाज अदा करण्यासाठी जात असताना हा स्फोट करण्यात आला होता. त्यामुळेच जखमींची संख्या जास्त होती. हल्ल्याच्या एक दिवसानंतर, ३० सप्टेंबर २००८ रोजी, मालेगावच्या आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.