जेपी नड्डा यांची काँग्रेसवर टीका (फोटो- ani)
१. जेपी नड्डा यांचा काँग्रेसवर निशाणा
२. हा नवीन भारत आहे, पाकिस्तानला योग्य प्रत्युत्तर मिळणारच असे नड्डा म्हणाले.
३. राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरबाबत चर्चा सुरु आहे.
नवी दिल्ली/JP Nadda on Operation Sindoor: केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. राज्यसभेत बोलताना ऑपरेशन सिंदूरवरून (Operation Sindoor) जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत सविस्तर ऑपरेशन सिंदूरवर चर्चा केली होती. त्यावेळेस मोदींनी संसदेत काँग्रेसवर निशाणा साधला होता. आज केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
राज्यसभेत बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा म्हणाले, “आपल्याला त्यांची (काँग्रेसच्या तत्कालीन सरकारची) तुष्टीकरणाची भावना समजून घेणे आवश्यक आहे. २००८ मध्ये इंडियन मुजाउद्दीनद्वारे जयपूरमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगले संबंध व्हावेत यासाठी प्रत्यन झाले. ते आमच्यावर ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही त्यांना बिर्याणी घालायला गेलो.”
पुढे बोलताना केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा म्हणाले, “त्यांच्या सरकारच्या काळात आपल्याकडे लष्करी शक्ती होती. मात्र त्यांच्याकडे राजकीय इच्छाशक्ती नव्हती. २००९ मध्ये एससीओ शिखर संमेलनात २००८ च्या हल्ल्याचा साधा उल्लेख झाला नाही. तत्कालीन सरकारने २००५ च्या दिल्ली सिरीयल बॉम्बस्फोट, २००६ च्या वाराणसी दहशतवादी हल्ला, २००६ च्या मुंबई ट्रेनमधील बॉम्ब स्फोट याबाबत कोणतीही कारवाई केली नाही.”
“१९४७ नंतर भारताच्या पंतप्रधानांनी सार्वजनिकपणे सांगितले होते की, उरी हल्ल्यातील दोषींना सोडले जाणार नाही. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला आणि दहशतवादी अड्डे उध्वस्त केले. हा नवीन भारत आहे.”
जयशंकर यांनी काढले काँग्रेसचे वाभाडे
ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) बोलताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले, “६० वर्षे म्हटले जात होते की, नेहरूंच्या चुका सुधारल्या जाऊ शकत नाही. मात्र मोदी सरकारने (Pm Narendra Modi)कलम ३७० हटवून आणि आता सिंधू जल करार स्थगित करून चुका सुधारल्या जाऊ शकतात हे दाखवून दिले. जोवर पाकिस्तान दहशतवादाला सोडत नाही तोवर सिंधू जल करार स्थगितच राहणार आहे.”
राज्यसभेत बोलताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरम्हणाले, “जयराम रमेशजी नीट कान देऊन एका, २२ एप्रिल ते १६ जून या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात एकही फोन कॉल झालेला नाही. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने अनेक आक्रमक निर्णय घेतले. धोरणात्मक निर्णय घेतले. सिंधू जल करार रद्द करून पाकिस्तानला थेंब-थेंब पाण्यासाठी तड्फडवण्यात आले. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रोखण्यात आला. सीमा बंद करण्यात आल्या.”