Mallikarjun Kharge on PM Modi Manipur Visit: मणिपूर राज्यातील २०२३ मध्ये हिंसाचार उफाळला होता. त्यानंतर राज्यात गेल्या दोन-अडीच वर्षांपासून हिंसाचाराच्या आगीत धुमसत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१३ सप्टेंबर) मणिपूर दौऱ्यावर आहेत. यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा मणिपूर दौरा हा तेथील पीडित नागरिकांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखा आहे. पंतप्रधानांनी मणिपूरमधील हिंसाचार आणि दुर्घटनेकडे सतत दुर्लक्ष केले आणि आता निवडणुका जवळ आल्या असताना ते फक्त तीन तासांच्या “प्रचार दौऱ्यावर” आले आहेत.” अशा शब्दांत खर्गेंनी नरेंद्र मोदींच्या मणिपूर दौऱ्यावर हल्लाबोल केला आहे.
भयानक! TTP दहशतवाद्यांचा सैनिकांच्या बसवर बॉम्ब ब्लास्ट; 12 जवान ठार तर…; कुठे घडली घटना?
काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांची तुलना मणिपूरमधील परिस्थितीशी करून नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ” गेल्या ८६४ दिवसांत पंतप्रधान मोदी ४६ वेळा परदेश दौऱ्यावर गेले, परंतु त्यांनी एकदाही मणिपूरला भेट दिली नाही, जिथे ३०० हून अधिक लोकांचा बळी गेला, ६७ हजारांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. पंतप्रधानांचा शेवटचा मणिपूर दौरा जानेवारी २०२२ मध्ये होता, तोही फक्त निवडणूक प्रचारासाठी, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत मणिपूर दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत पंतप्रधानांचा चुराचंदपूर आणि इंफाळमधील रोड शो हा केवळ वरवरचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. खर्गे म्हणाले की, “पंतप्रधानांचा हा दौरा मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांच्या दुःखापासून दूर जाण्याची एक रणनीती आहे. हे दौरे केवळ भव्य स्टेज सजवण्यासाठी आणि मीडियामध्ये मथळे मिळवण्यासाठी केले जात आहेत.”
शासकीय कर्मचाऱ्यांनो, कार्यालयात ओळखपत्र लावूनच फिरा; अन्यथा होणार कारवाई
काँग्रेस अध्यक्षांनी केंद्र सरकारवर आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही जोरदार टीका केली. त्यांनी नमूद केले की, मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करूनही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. “राज्य सरकार जेव्हा हिंसाचार थांबवण्यात अपयशी ठरले, तेव्हा केंद्राने कठोर कारवाई करणे गरजेचे होते. मात्र केंद्राने आपली जबाबदारी पार पाडली नाही,” असा आरोप त्यांनी केला.
खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून विचारले की, “तुमचा राजधर्म कुठे गेला आहे?” त्यांनी या दौऱ्याला सहानुभूती किंवा पश्चात्तापाचे लक्षण मानण्यास नकार दिला असून, हा दौरा केवळ ‘प्रसिद्धीचा इव्हेंट’ असल्याचे म्हटले. “पंतप्रधानांनी संवैधानिक जबाबदाऱ्यांपासून पाठ फिरवली असून, पीडितांच्या दुःखाबद्दल ते गंभीर नाहीत,” अशी तीव्र टीका खर्गे यांनी केली.