नवी दिल्ली : इस्लामिक धर्मगुरु झाकीर नाईकला केंद्र सरकारने मोठा झटका दिला आहे. झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर केंद्र सरकारने पूर्णपणे बंदी घातली आहे. यूएपीए कायद्यांतर्गत ही बंदी घालण्यात आली असून त्यासंबंधी केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
देशाच्या सुरक्षेला धोकादायक असणाऱ्या अनेक कृत्यांमध्ये इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन सहभागी आहे. त्यामुळं देशातील शांतता भंग होऊ शकते, सांप्रदायिक सद्भावना बिघडू शकते असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे यूएपीए कायद्यांतर्गत इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी घालण्यात आल्याचे केंद्र सरकारने सांगितले.
झाकीर नाईकने दिलेली भाषण द्वेष पसरवणारी आणि विध्वंसक असतात, अशी भाषणे आणि विधानांमुळे नाईक विविध धार्मिक समूहांमध्ये वैर निर्माण करत आहेत. द्वेष पसवरण्याचं काम करत आहेत. भारत आणि विदेशातील एका विशेष धर्मातील तरुणांना दहशतवादी कृत्य करण्यास भाग पाडलं जात आहे असे केंद्र सरकारचे मत आहे.
इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनमुळे देशविरोधी भावनांचा प्रचार केला जाईल आणि त्यामुळे देशाची अखंडता धोक्यात येईल अशी भीती केंद्र सरकारने व्यक्त केली आहे.
भारतावरील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, मलेशियामध्ये भारतातील शहरांवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आला होता. याचा खुलासा इस्लामी धर्मगुरु झाकीर नाईक आणि रोहिंग्या दहशतवादी संघटनांमध्ये झालेल्या दोन लाख डॉलर्सच्या व्यवहारानंतर करण्यात आला होता.