
नवी दिल्ली : भारतात सध्या डिजिटल व्यवहारांची (Online Payment) संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गुगल पे (GooglePay), फोन पे (PhonePe), पेटीएम (Paytm) यांसारख्या प्लॅटफॉर्मवरून ऑनलाईन व्यवहार केले जात आहेत. पण त्यासाठी वायफाय किंवा इंटरनेटची गरज असते. मात्र, आता इंटरनेटशिवाय ऑनलाईन व्यवहार करता येणार आहेत.
सध्या कोणतेही ऑनलाईन व्यवहार करताना इंटरनेटची गरज असते. जर चांगलं इंटरनेट कनेक्शन असेल तर व्यवहार अगदी सहज करता येऊ शकतात. पण आता इंटरनेटशिवाय व्यवहार करता येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला फक्त एक नंबर डायल करावा लागेल. या माध्यमातून तुम्ही स्मार्टफोनशिवाय म्हणजे अगदी फीचर फोनवरूनही ऑनलाईन पेमेंट करू शकता.
ऑनलाईन पेमेंटसाठी एक नंबर
इंटरनेटशिवाय पेमेंटसाठी *99# नंबर दिला गेला आहे. या नंबरच्या माध्यमातून इंटरनेटशिवायही पेमेंट करता येऊ शकेल. हे सर्व बँकिंग सेवांसह येते. यामध्ये 83 बँका आणि 4 दूरसंचार सेवा पुरवठादारांचा समावेश आहे. त्यात अनेक भाषा आहेत. यामध्ये तुम्ही फक्त पैसेच पाठवू शकत नाही तर UPI पिन देखील बदलू शकता आणि तुमच्या खात्यात किती पैसे आहेत, हे देखील तपासू शकता.
असे करा इंटरनेटशिवाय पेमेंट
– पहिल्यांदा तुमच्या बँकेतील रजिस्टर नंबरवरून *99# डायल करा.
– नंतर तुम्हाला भाषा आणि बँकेचे नाव टाकावे लागेल.
– यानंतर, तुमचा नंबर ज्या बँकांमध्ये नोंदणीकृत आहे, त्या सर्व बँकांची यादी दिसेल.
– यानंतर तुम्हाला डेबिट कार्ड लागेल. यामध्ये तुम्हाला कार्डची एक्सपायरी डेट आणि शेवटचा 6 अंकी क्रमांक टाकावा लागेल. यानंतर तुम्ही पेमेंट करू शकाल.
नंतर हे करा काम…
ही संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनवर *99# डायल करणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला 1 डायल करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला काही पर्याय दिले जातील. ज्यात UPI आयडी / फोन नंबर / बँक खाते क्रमांक समाविष्ट असेल. तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत ती व्यक्ती निवडावी लागेल.
यानंतर तुम्हाला पैसे टाकावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा UPI पिन टाकावा लागेल. यानंतर पेमेंट पूर्ण होईल. अशाप्रकारे तुम्ही जास्तीत जास्त 5 हजार रुपये पाठवू शकता.