कोविडने वाढवली चिंता
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रातच नाहीतर इतरही राज्यात ही रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. एका आठवड्यात एकूण रुग्णांची संख्या पाच पट वाढली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, देशभरात 2710 सक्रिय कोरोना रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली आहे.
केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्या पाठोपाठ महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेल्या 7 जणांचा मृत्यूही झाला आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संसर्गामुळे सरकारची चिंता वाढली आहे. गेल्या पाच महिन्यांत कोरोनामुळे 22 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रातच दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, दिल्ली, गुजरात, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतही कोरोनामुळे पहिला मृत्यू नोंदवला गेला आहे. असे देशभरात सात मृत्यू झाले आहेत.
हेदेखील वाचा : Corona Update: मोठी बातमी! साताऱ्यात ‘करोना’ने महिलेचा मृत्यू; खबरदारी घेण्याचे आवाहन
दरम्यान, केरळमध्ये सध्या 1147 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात 424, दिल्लीत 294 आणि गुजरातमध्ये 223 आहेत. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 148 रुग्णांची नोंद झाली आहे. पश्चिम बंगालमध्येही कोरोनाचे 116 रुग्ण आढळले आहेत.
चार दिवसांत 1700 नवे रुग्ण
26 मे रोजी देशभरात 1010 कोरोना रुग्ण होते. ३० मे रोजी हा आकडा २७१० पर्यंत वाढला. त्यानुसार, अवघ्या चार दिवसांत १७०० रुग्ण वाढले आहेत. बिहारमध्ये कोरोनाचे आकडे मिळवणे कठीण होत आहे. पाटणामध्ये गेल्या २४ तासांत सात कोरोना रुग्ण आढळले आहेत. येथे आतापर्यंत एकूण १७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, सिक्कीममध्ये आतापर्यंत कोविडचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
साताऱ्यात महिलेचा कोरोनाने मृत्यू
सातारा जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेत असणाऱ्या ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी सांगितले. साताऱ्यात अडीच वर्षानंतर कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एक कराड येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर एक महिला सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती.