धक्कादायक! पद्मश्री पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञाचा मृतदेह आढळला कावेरी नदीत, ३ दिवसापासून होते बेपत्ता
भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक, कृषीतज्ज्ञ (मत्स्यपालन) आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सुब्बन्ना अय्यप्पन (७०) यांचा मृतदेह कावेरी नदीत आढळल्याने खळबळ माजली आहे. त्यांचा मृतदेह शनिवारी मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टन येथील कावेरी नदीत आढळला असून मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत.
“ते मैसूरमधील विश्वेश्वरनगर औद्योगिक भागात अक्कामहादेवी रोड येथे राहात होते. त्यांची स्कूटर नदीकिनारी सापडली. डॉ. सुब्बण्णा अय्यप्पन मैसूरच्या श्री रामकृष्ण आश्रमात आणि सिरीरंगपटणममधील कावेरी नदीच्या किनारी ध्यानासाठी जात असत. तीन दिवसांपूर्वी साईबाबा आश्रमाजवळील कावेरी नदीत उडी घेऊन त्यांनी आपलं आयुष्य संपवलं असावं, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
“ घरातून निघून गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तीन दिवसांपूर्वी मैसूरच्या विद्यारण्यमपुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांचा मृतदेह के.आर. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत्यूचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही,” असं पोलिसांनी सांगितलं.
डॉ. अय्यप्पन कृषी व मत्स्य (जलसंपत्ती) शास्त्रज्ञ होते. त्यांनी दिल्ली, मुंबई, भोपाळ, बाराकपूर, भुवनेश्वर आणि बेंगळुरु येथे काम केलं. ते ICAR चे प्रमुख बनणारे पहिले ‘नॉन-क्रॉप’ (पीक नसलेले) शास्त्रज्ञ होते. त्यांनी भुवनेश्वर येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर अॅक्वाकल्चर (CIFA) चे संचालक, मुंबईच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन (CIFE) चे संचालक, केंद्रीय कृषी संशोधन व शिक्षण विभागाचे सचिव, हैदराबाद येथील नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्डचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीजचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले.
बीड जिल्ह्यात भीषण अपघात, कारची लक्झरी बसला धडक; दोघांचा जागीच मृत्यू
भारताच्या ‘नीळी क्रांती’मध्ये त्यांचा मोठा वाटा होता. त्यांना २०२२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. कृषी संशोधनात सक्रिय असतानाच त्यांनी अनेक संस्थांची उभारणी व घडणूक केली. ते इंफाळ येथील सेंट्रल अॅग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीचे कुलगुरूही होते.
१० डिसेंबर १९५५ रोजी चामराजनगर जिल्ह्यातील यलंदूर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी मंगळुरु येथून १९७५ मध्ये फिशरीज सायन्समध्ये पदवी (BFSc), १९७७ मध्ये पदव्युत्तर पदवी (MFSc), आणि १९९८ मध्ये बेंगळुरुच्या कृषी विद्यापीठातून पीएच.डी. केली होती. त्यांनी अनेक समित्यांचे नेतृत्व केले आणि विविध पुरस्कार प्राप्त केले.