कारगिल : भारत शांततेसाठी प्रयत्न करत होता, पाकिस्तानने जेव्हा जेव्हा भारताच्या विरोधात कुरापती करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांनी इतिहासातून कोणताही धडा घेतलेला नाही.” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. कारगिल विजय दिवसानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी कारगिल वॉर मेमोरिअलला भेट दिली, यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी 1999 च्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, आज लडाखची ही महान भूमी कारगिल विजयाला 25 वर्षे पूर्ण झाल्याची साक्ष देत आहे. कारगिल विजय दिवस आपल्याला सांगतो की कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी देशासाठी दिलेले बलिदान अमर आहे आणि म्हणूनच कारगिल विजय दिवस सदैव स्मरणात राहील. 1999 मध्ये कारगिलच्या बर्फाळ शिखरांवर तब्बल तीन महिने शत्रुशी लढा देत भारतीय सैनिकांनी 26 जुलै 1999 रोजी ‘ऑपरेशन विजय’ ची घोषणा केली. दिवस, महिने, वर्षे, शतके लोटतात, ऋतूही बदलतात पण देशाच्या रक्षणासाठी जिवाचे बलिदान देणाऱ्यांची नावे कायम स्मरणात राहतात. हा देश आपल्या सैन्यातील पराक्रमी महान वीरांचा सदैव ऋणी आहे आणि काय ऋणी राहिल.
ते म्हणाले, ‘माझं भाग्य आहे की, कारगिल युद्धादरम्यान एक सामान्य देशवासी म्हणून मी माझ्या सैनिकांमध्ये होतो. आज मी पुन्हा कारगिलच्या भूमीवर आल्यावर त्या आठवणी माझ्या मनात ताज्या झाल्या. मला आजही आठवते की, इतक्या कठीण परिस्थितीत आपल्या भारती सैन्याने इतक्या उंचीवर इतके कठीण लढाऊ ऑपरेशन्स पूर्ण केले. देशाला विजय मिळवून देणाऱ्या अशा सर्व शूरवीरांना माझा आदरपूर्वक सलाम. कारगिलमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांना मी सलाम करतो.
पीएम मोदी म्हणाले, ‘आपण फक्त कारगिलचे युद्धच जिंकले नाही. तर आपण सत्य, संयम आणि शक्तीचे अप्रतिम प्रदर्शनही केले होते. भारत त्यावेळी शांततेसाठी प्रयत्न करत होता, त्या बदल्यात पाकिस्तानने पुन्हा एकदा आपला अविश्वासू चेहरा दाखवला. पण सत्यासमोर असत्याचा आणि दहशतीचा पराभव झाला. पाकिस्तानने यापूर्वी कितीही प्रयत्न केले, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले पण पाकिस्तानने आपल्या इतिहासातून कोणताही धडा घेतला नाही. हे दहशतवादाच्या मदतीने, प्रॉक्सी वॉरच्या मदतीने स्वतःला सुसंगत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु दहशतवादांच्या धन्याला माझा थेट आवाज पोहोचेल अशा ठिकाणाहून मी आज बोलत आहे, मी दहशतवादाच्या आश्रयदात्यांना थेट आव्हान करत आहे. तुमचे घाणेरडे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत. आमचे शूर जवान दहशतवादाला पूर्ण ताकदीने चिरडून टाकतील. शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. लडाख असो वा जम्मू-काश्मीर, भारत आपल्या विकासासमोरील प्रत्येक आव्हानाचा पराभव करेल.