मुंबई : 1992 साली राजस्थानातील अजमेर (Ajmer 92) चर्चेच्या केंद्रस्थानी आलं होतं. अनेक मुलींवर बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्याच्या घटना शहरात समोर आल्या होत्या. या प्रकरणाचा पुढं जसजसा तपास होऊ लागला तसतसं या प्रकरणात राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची नावं समोर यऊ लागली होती. या खटल्यानं पीडित मिहला अनेक वर्ष न्यायाची लढाई लढतायेत. अद्याप या प्रकरणातील पीडितांना न्याय मिळालेला नसताना, आता या प्रकरणावर आधारित सिनेमा येऊ घातलाय. या सिनेमाचं नाव आहे अजमेर 92.
सिनेमा रीलिज होण्यापूर्वीच वादात
अजमेर 92 प्रदर्शित होण्यापूर्वीच या सिनेमावरुन वाद रंगू लागलेला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप करण्यात येतोय. या सिनेमातील कथेलाजमीयत-उलेमा-ए-हिंद या संघटनेनं विरोध केला आहे. या सिनेमावर बंदी घालावी अशी मागणी या संघटनेच्या वतीनं करण्यात आलीय.
सिनेमावर बंदी घालण्याची का होतेय मागणी?
जमीयतचे अध्यक्ष मौलाना महमूद गजनी यांनी दावा केला आहे की, या सिनेमाच्या माध्यमातून अजमेर शऱीफच्या दर्ग्याच्या बदनामीचा कट करण्यात येतोय. त्यामुळं सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येतेय. गुन्हेगारी घटनांना धर्मांशी जोडण्याऐवजी अशा गुन्ह्यांविरोधात एकजुटीनं कारवाईची गरज असल्याचं त्यांचं म्हणणंय. या सिनेमातून समाजात दरी निर्माण होईल, अशी भीती त्यांनी वर्तवली आहे.
1992 साली नेमकं काय झालं होतं?
पुष्पेंद्र सिंह दिग्दर्शित या सिनेमात जरीना वहाब, सयाजी शिंदे, मनोज जोशी, राजेश शर्मा हे कलाकार आहेत. हा सिनेमा सत्य कथेवर बेतलेला असल्याचं सांगण्यात येतंय. या सिनेमात अजमेरमध्ये काही वर्षांपूर्वी 100 हून अधिक शाळकरी मुलींना ब्लॅकमेल करण्यात आल्याची आणि त्यांचं लैंगिंक शोषण केल्याची कथा आहे. ज्यावेळी एका कलर लॅबनं मुलींचे नग्न फोटो छापले आणि त्याचं वितरण केलं, त्यानंतर हा प्रकार उघड झाला होता, असं सांगण्यात येतंय.
अजमेरचे प्रसिद्ध चिश्ती यांचंही नाव ?
या खटल्यात प्रसिद्ध चिश्ती जोडी फारुख आणि मफीस यांचीही नाव समोर आली होती. अजमेर शरीफ दर्ग्याशी संबंधित मोठ्या परिवारांशी हे संबंधित आहेत. या चिश्तींच्या मित्रांच्या टोळीनं शाळेत जाणाऱ्या मुलींना काही महिने धमक्या दिल्या होत्या. त्यानंतर बॅकमेलच्या जाळ्यात त्यांना ओढलं. त्यांच्यावर सामूहिक बलात्कारही करण्यात आले.