रायपूर : पब्जीच्या (PubG) माध्यमातून भारतीय तरुणाच्या प्रेमात पडलेल्या पाकिस्तानमधील सीमा हैदर (Seema Haider) या तरुणीचे प्रकरण ताजे असतानाच, आता झारखंडमधील इन्स्टावरील लव्हस्टोरीची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) ओळख झालेल्या झारखंडमधील तरुणांच्या प्रेमात पडलेली पोलंडमधील महिला पर्यटन व्हिसावर भारतात आली आहे.
पोलंडमधील 49 वर्षीय बार्बरा पोलक (Barbara Polak) ही महिला झारखंडच्या हजारीबागमध्ये तिच्या भारतीय प्रियकर शादाब मलिकसोबत राहण्यासाठी भारतात आली आहे. तिने आपल्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला आहे. बार्बरा आणि शादाब यांची इन्स्टाग्रामवर मैत्री 2021 मध्ये झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आता बार्बरा आपल्या सहा वर्षांची मुलगी अनन्यासोबत भारतात आली आहे. सध्या ती झारखंडमधील बरतुआ गावात प्रियकर शादाबसोबत राहत आहे. लवकरच बार्बरा शादाबशी लग्न करणार असून ती 2027 पर्यंत वैध असलेल्या पर्यटन व्हिसावर भारतात आली आहे.
भारतात सेलिब्रिटी असल्यासारखे वाटले
बार्बरा आणि शादाब आता विवाह बंधनात अडकणार आहेत. हजारीबाग उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) न्यायालयात दोघांनी लग्नासाठी अर्ज केला आहे. बार्बरा आणि शादाब यांच्या लग्नाची गावात जोरदार तयारी सुरू आहे. माध्यमांशी बोलताना म्हणाली, भारत हा एक सुंदर देश आहे. मी जेव्हा प्रथम हजारीबागमध्ये आले तेव्हा बरेच लोक मला भेटायला आले. मला सेलिब्रिटी असल्यासारखे वाटले. माझे पोलंडमध्ये घर आहे. मी मूळची पोलंडची असून, मला येथे चांगली नोकरी होती. शादाब आलमसाठी मी हजारीबागला आले आहे. आम्ही लवकरच एकमेकांशी लग्न करणार आहोत.