नीति आयोगाच्या बैठकीतून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बाहेर
दिल्ली : दिल्लीमध्ये नीति आयोगाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 9 व्या गवर्निंग काऊन्सिलची ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. देशाचा विकास आणि विकासाची दिशा या बैठकीमधून ठरवण्यात येते. मात्र या बैठकीवरुन राजकारण रंगले आहे. दिल्लीमध्ये आयोजित या नीति आयोगाच्या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला. अर्थसंकल्पामध्ये भाजप शासित नसलेल्या राज्यांसोबत भेदभाव झाल्याचा आरोप इंडिया आघाडी करत आहे. त्यामुळे विरोधकांनी बैठकीला न जाण्याचे ठरवले. मात्र तरीही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांमध्ये आपले वेगळेपण दाखवून बैठकीला उपस्थिती लावली. मात्र अवघ्या 5 मिनीटांमध्ये त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला.
माझा माईक बंद करण्यात आला
दिल्लीमध्ये झालेल्या या नीति आयोगाच्या बैठकीवर जोरदार राजकारण रंगले आहे. बैठक सुरु झाल्यानंतर अवघ्या 5 मिनिटांमध्ये ममता बॅनर्जी बाहेर आल्या. यावेळी बाहेर येऊन त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करत घणाघाती आरोप केले आहेत. मीडियासमोर ममता बॅनर्जी यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या “मला बैठकीमध्ये बोलू दिलं गेलं नाही. फंडाची मागणी केल्यानंतर माझा माईक बंद करण्यात आला. मला केवळ 5 मिनिटं बोलायला दिलं. इतर मुख्यमंत्र्यांना वीस मिनिटे बोलायला दिली. केंद्र सरकार बंगालसोबत भेदभाव करत आहे. बिगर एनडीएशासित राज्यांसोबत भेदभाव केला जातोय. मी सभेला हजेरी लावतीये, तिथे विरोधी पक्षाकडून मी एकटीच आहे आणि तुम्ही मला बोलण्यापासून रोखत आहात…हा केवळ बंगालचाच नाही तर सर्व प्रादेशिक पक्षांचाही अपमान आहे.” असा गंभीर आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
विकासकामात राजकारण ही काँग्रेसची मानसिकता
नरेंद्र मोदी मार्गदर्शन करत असताना ममता बॅनर्जी यांनी अवघ्या 5 मिनिटांमध्ये काढता पाय घेतल्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहे. बिहारचे मंत्री नितीन नबीन यांनी विरोधकांवर व इंडिया आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे. नबीन म्हणाले की, “विकास कार्यात राजकारण करायचं, ही काँग्रेसची सुरुवातीपासून मानसिकता आहे. आज विकास कार्यांवर चर्चेसाठी ही बैठक आहे. नीति आयोग हा काही भाजपाचा ढाचा नाही. नीति आयोगाची जेव्हा बैठक होते, तेव्हा ते प्रत्येक राज्यासाठी विकास मॉडेल ठरवतात. काँग्रेसला केवळ तृष्टीकरणाच्या राजकारणात रस आहे. त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा राहिलेला नाही. म्हणून ते आता नीति आयोगाच्या बैठकीचा विरोध करत आहेत” अशी घणाघाती टीका नितीन नबीन यांनी केली आहे.