'दहशतवादी हल्ले झाले तर योग्य प्रत्युत्तर देणार'; जयशंकर यांचा अमेरिकेतून पाकिस्तानला इशारा
जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पुन्हा एकदा आपली कठोर आणि स्पष्ट भूमिका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या अमेरिकेच्या चार दिवसीय दौऱ्यावर असून, त्याच दरम्यान क्वाड (QUAD) परिषदेच्या निमित्ताने त्यांनी पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांत नवा अध्याय; एस. जयशंकर-पेनी वोंग भेटीत द्विपक्षीय सहकार्याला नवी दिशा
क्वाड परिषदेची बैठक अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे झाली. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या चार देशांचा हा मंच जागतिक राजकारणात आणि सुरक्षा विषयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. याच मंचावर बोलताना जयशंकर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि भविष्यात भारतावर असे हल्ले झाल्यास त्याला कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल, असे स्पष्ट केलं.
“भारत शांत बसणारा देश नाही. जर पुन्हा अशा प्रकारचे हल्ले झाले, तर केवळ हल्लेखोरच नव्हे, तर त्यांना पाठीशी घालणाऱ्यांनाही आम्ही लक्ष्य करू,” असे ठाम विधान जयशंकर यांनी केलं. त्यांनी सांगितले की, भारताचा हा संदेश पाकिस्तानपर्यंत पोहोचवण्यात आला आहे आणि देशाची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे.
जयशंकर यांनी यावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतही क्वाड सदस्यांना माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केलं की, भारत गेल्या अनेक दशकांपासून दहशतवादाचा सामना करत आहे. “आता भारतानं नवं धोरण स्वीकारलं आहे – फक्त बचावावर विश्वास न ठेवता, हल्ल्यांना निर्णायक आणि आक्रमक प्रत्युत्तर दिलं जाईल,” असं सांगत त्यांनी ७ मे रोजी भारताने केलेल्या कारवाईचं समर्थन केलं.
या बैठकीच्या दरम्यान भारताच्या राजकीय ऐक्याचंही त्यांनी विशेष कौतुक केलं. विविध राजकीय पक्षांचे नेते परराष्ट्र दौऱ्यावर एकत्र आले असून, त्यांनी एकसंधपणे भारताची भूमिका मांडली, हे विशेष महत्त्वाचं असल्याचं जयशंकर म्हणाले. “शशी थरूर, सुप्रिया सुळे, कनिमोई, रविशंकर प्रसाद, जय पांडा, संजय झा, सलमान खुर्शीद, अनिल शर्मा आणि गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेक नेत्यांनी परदेशात भारताची बाजू सशक्तपणे मांडली,” असं त्यांनी नमूद केलं.
या संपूर्ण संवादातून एक गोष्ट स्पष्ट झाली – भारत आता दहशतवादाच्या विरोधात अधिक निर्धाराने आणि एकजुटीने उभा आहे. केवळ आंतरिक पातळीवर नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारत आता आपली सुरक्षा आणि सार्वभौमत्व याबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, याचा ठाम संदेश परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिला आहे. या भाषणामुळे पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढण्याची शक्यता असून, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताची भूमिका आणखी बळकट झाली आहे.