नवी दिल्ली : पाकिस्तानच्या सीमा हैदर (Seema Haider) आणि ग्रेटर नोएडाच्या सचिन मीना (Sachin Meena) यांची लव्हस्टोरी सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील प्रत्येकाला त्याच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. असे जरी असले तरी सीमा हैदरची एटीएसकडून कसून चौकशी केली जात आहे.
सीमा हैदर ही गुप्तहेर असल्याच्या संशयातून एटीएसकडून चौकशी सुरु आहे. याच चौकशीदरम्यान ती निराश झाल्याचे दिसत आहे. यानंतर उत्तर प्रदेश एटीएसने सीमा आणि सचिनची चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत अनेक नवे खुलासे झाले आहेत. त्यामध्ये भारतात येण्यापूर्वी सीमाने 70 हजार पाकिस्तानी रुपयांना मोबाईल खरेदी केला होता. चौकशीदरम्यान सीमाने उत्तर प्रदेश एटीएसला मोबाईल खरेदीची माहिती दिली आहे.
एटीएसकडून कसून चौकशी
मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता पाकिस्तानी महिला सीमा, तिची एक मुलगी आणि एक मुलगा आणि सचिनचे वडील नेत्रपाल यांना एटीएसने पुन्हा चौकशीसाठी नेण्यात आले होते. एटीएसने काल रात्री चौकशी केल्यानंतर नेत्रपाल आणि सीमा यांना घरी सोडले. मात्र, सचिनला त्यांच्याकडे ठेवले. सचिन अजूनही एटीएसच्या ताब्यात आहे, आता सीमा आणि नेत्रपाल यांना एटीएसने ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा चौकशी सुरू झाली आहे.