नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला (AAP) मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. याउलट भारतीय जनता पक्षाने (BJP) 70 पैकी 48 जागांवर विजय मिळवत 27 वर्षांनंतर राजधानी दिल्लीत सत्ता स्थापन केली. दुसरीकडे, AAPच्या जागा घटून 22 वर आल्या, ज्यामुळे पक्षाचा मोठा जनाधार कमी झाल्याचे स्पष्ट झाले. 2020 च्या निवडणुकीत AAPने 62 जागांवर विजय मिळवला होता. मात्र यावेळी त्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर घटला. दरम्यान, काँग्रेस पक्षाने INDIA आघाडीचा भाग असूनही स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आणि एकही जागा जिंकू शकला नाही.
AAPच्या पराभवानंतर पक्षाच्या माजी सहकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. स्वराज इंडिया पक्षाचे सह-संस्थापक आणि राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी AAPच्या पराभवाला “पर्यायी राजकारणाच्या स्वप्नाला मोठा धक्का” असे संबोधले. हा पराभव केवळ AAPसाठीच नाही तर प्रामाणिक आणि पारदर्शक राजकारणावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व लोकांसाठीही धक्कादायक आहे.
AAPचे माजी नेते आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर सत्ता केंद्रीकरणाचा आरोप केला. एकेकाळी पारदर्शकता आणि जबाबदारीची भाषा करणारा AAP पक्ष आता केवळ केजरीवाल यांच्या हातात सत्ता केंद्रीत झालेला ‘सुप्रीमो-डोमिनेटेड’ पक्ष बनला आहे. केजरीवाल यांनी पक्षाच्या लोकपाल पदावर असणाऱ्या व्यक्तीला काढून टाकले आणि सरकारी निधीचा दुरुपयोग करून स्वतःच्या ऐशोआरामासाठी खर्च केला.
अरविंद केजरीवाल यांचा प्रवास एक प्रशासकीय अधिकारी ते दिल्लीचे मुख्यमंत्री असा मोठा आणि प्रेरणादायी राहिला आहे. त्यांनी सामाजिक कार्यातून राजकारणात प्रवेश करत भ्रष्टाचाराविरोधी लढाईत मोठी भूमिका बजावली. अरविंद केजरीवाल यांचा जन्म 16 ऑगस्ट 1968 रोजी हरियाणामधील हिसार येथे झाला. त्यांनी आयआयटी खरगपूर येथून मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर 1995 मध्ये भारतीय महसूल सेवेत (IRS) नोकरी पत्करून इनकम टॅक्स अधिकारी म्हणून कार्यरत राहिले.
रक्तासारखी लाल झाली ‘या’ देशातील नदी; लोकांमध्ये भीतीचे वातावरण, काय आहे रहस्य?
प्रशासकीय सेवेत असताना त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्याचा निर्धार केला आणि माहितीचा अधिकार (RTI) चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. 2006 मध्ये त्यांनी प्रशासकीय नोकरीचा राजीनामा देऊन पब्लिक कॉज रिसर्च फाउंडेशन (PCRF) नावाची संस्था स्थापन केली. त्यांना “मॅगसेसे पुरस्कार” मिळाला, जो आशियातील नोबेल पुरस्कार मानला जातो.
2024 मध्ये कथित दारू धोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना तुरुंगवास भोगावा लागला, त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांनी जनतेकडून ‘ईमानदारीचे प्रमाणपत्र’ मागितले. मात्र 2025 च्या निकालाने हे स्पष्ट केले की दिल्लीतील मतदारांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. अनेक राजकीय विश्लेषक AAPच्या या पराभवाला पक्षाच्या धोरणांमधील त्रुटी आणि नेतृत्वाच्या अपयशाशी जोडत आहेत. त्यामुळे दिल्लीच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडले आहेत.