रक्तासारखी लाल झाली 'या' देशातील नदी; लोकांमध्ये भीतीचे वातावरण, काय आहे रहस्य? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ब्यूनर्स आयर्स: अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनर्स आयर्सच्या उपनगरात एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली आहे. एका लहान नदीचे पाणी अचानक गडद लाल झाले असून, यामुळे स्थानिक रहिवाशांना धक्का बसाल असून भितीचे वातावरण पसरले आहे. ही नदी रिओ डे ला प्लाटा मुहाण्यावर येऊन मिळते, जी एक संरक्षित पर्यावरणीय क्षेत्राच्या सीमेजवळ आहे.नागरिकांना नदीचे पाणी अचानक लाल झाल्याचे दिसले आणि त्यासोबतच एक विचित्र वासही येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेने परिसरात खळबळ उडवली आहे. काही स्थानिकांनी सांगितले की यापूर्वीही नदीचे पाणी कधीकधी पिवळसर होत असे तर कधी हिरवे आणि त्यातून एक प्रकारचा आमली वास येत असे. मात्र, यावेळी नदीचे गडद लाल होणे, एखाद्या रक्ताने भरलेल्या प्रवाहासारखे भासत असल्याने नागरिक अधिक घाबरले आहेत.
रासायनिक कचऱ्याचा परिणाम?
स्थानिक नागरिक आणि तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नदीचे पाणी बदलण्यामागे परिसरातील कारखान्यांचा हात आहे. या भागात अनेक चमड्याच्या प्रक्रिया करणारे आणि कपड्यांचे रंग तयार करणारे उद्योग कारखाने आहेत. हे कारखाने अनेकदा रासायनिक कचरा नदीत सोडत असल्याचे देखील यापूर्वी नोंदवले गेले आहे. यामुळे नदीच्या पाण्याचा रंग बदलण्यामागे औद्योगिक प्रदूषण हे एक संभाव्य कारण असू शकते.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागातील काही कापड आणि चामड्याचे कारखाने त्यांच्या उत्पादन प्रक्रियेत वापरण्यात येणारे रसायने व रंग नदीत सोडतात. यामुळे पाणी विविध रंगांचे होत असते. मात्र, यावेळी हे प्रमाण अधिकच वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारी चौकशी आणि पाणी नमुने तपासणी
ही घटना समोर आल्यानंतर अर्जेंटिनाच्या पर्यावरण मंत्रालयाने या घटनेची सखोल चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. नदीतील पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले असून त्याचे रासायनिक विश्लेषण केले जात आहे. पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, हे पाणी तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवले गेले असून, त्यामधील घटकांचा सखोल अभ्यास केला जाईल. विशेषतः कोणते सेंद्रिय पदार्थ या रंग बदलण्यास कारणीभूत आहेत, हे तपासले जाणार आहे.
नागरिकांमध्ये संताप आणि चिंता
सध्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावर असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. संबंधित कारखान्यांवर कठोर कारवाईची मागणी देखील नागरिकांकडून करण्यात आली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही अशा घटना घडल्य़ा असून सरकारने योग्या त्या उपाययोजना केल्या पाहिजेत. लवकरच ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर ही प्रदूषण समस्या अधिक गंभीर होईल आणि पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होईल.