Shashi Tharoor News: जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर देशाचे उपराष्ट्रपती पद सध्या रिक्त आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी ९ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत ७ ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी केली जाईल. याबाबत ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी एक सूचक विधान केलं आहे. “देशाचा पुढचा उपराष्ट्रपती हा सत्ताधारी पक्षाने नामांकित केलेला असेल.’ असे शशी थरूर यांनी म्हटले आहे.
पुढील उपराष्ट्रपती पदाबद्दल विचारले असता, शशी थरूर म्हणाले की, ‘आम्हाला फक्त एवढेच माहिती आहे की पुढचा उपराष्ट्रपती हा सत्ताधारी पक्षाने नामांकित केलेला असेल, कारण मतदारांची रचना आधीच निश्चित झालेली आहे. यावेळी विरोधी पक्षाचाही सल्ला घेतला जाईल, अशी आमची अपेक्षा आहे. तसेच, पुढचा उपराष्ट्रपती कोण असेल हे आपल्याला माहित नाही, परंतु आम्हाला खात्री आहे की भावी उपराष्ट्रपतीदेखील सत्ताधारी भाजपचाच उमेदवार असेल. जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता.
यासंदर्भात बोलताना शशी थरूर म्हणाले, ‘ही संसदेच्या दोन्ही सभागृहांसाठी निवडणूक आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या विपरीत, जिथे राज्य विधानसभा देखील मतदान करतात. उपराष्ट्रपतीसाठी फक्त लोकसभा आणि राज्यसभा निवडली जातात. त्यामुळे आम्हाला बहुमताबद्दल आधीच माहिती आहे. मला वाटते की पुढील उपराष्ट्रपती सत्ताधारी पक्षाने नामांकित केलेली व्यक्ती असेल हे स्पष्ट आहे. पुढील उपराष्ट्रपती निवडीसाठी केंद्र सरकार विरोधी पक्षांशी सल्लामसलत करेल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती निवडणुकीची तारीख ९ सप्टेंबर निश्चित केली असून ७ ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी केली जाईल. नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट असेल. मतदानाच्या दिवशी म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील.
घेणं ना देणं फुकटचं कंदील लावून येणं! बैलांच्या भांडणात मुलगी आली आड अन् मग काय कंबरड्यात बसली लाथ
देशाच्या उपराष्ट्रपतीची निवड एका निवडणूक मंडळाद्वारे केली जाते, ज्यामध्ये राज्यसभेतील निवडून आलेल्या आणि नामांकित सदस्यांव्यतिरिक्त लोकसभेतील निवडून आलेले सदस्य असतात. दोन्ही सभागृहांची एकूण संख्या ७८२ आहे आणि जर सर्व पात्र मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला तर उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला जिंकण्यासाठी ३९१ मतांची आवश्यकता असेल. लोकसभेतील ५४२ पैकी २९३ सदस्यांचा आणि राज्यसभेतील २४० पैकी १२९ सदस्यांचा एनडीएला पाठिंबा आहे. सत्ताधारी आघाडीला एकूण ४२२ सदस्यांचा पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत, सत्ताधारी पक्षाला उपराष्ट्रपती म्हणून आपला उमेदवार निवडून आणण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
ऑगस्ट २०२२ पासून भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून कार्यरत असलेले जगदीप धनखड यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २१ जुलै रोजी राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०२७ रोजी संपणार होता. त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव अधिकृतपणे राजीनामा दिला, परंतु केंद्र सरकारशी असलेले त्यांचे मतभेद हे याचे कारण असल्याचे मानले जाते. धनखड यांनी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या महाभियोगाबाबत सरकारच्या भूमिकेशी सहमत होण्यास नकार दिल्याने हा तणाव वाढला.