..तर मोदींना डोक्यावर घेऊन नाचलो असतो; ठाकरेंचे अरविंद सावंत संसदेत कडाडले
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा सुरू आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सरकारची भूमिका मांडली असली तरी विरोधकांनी सरकारवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र धोरणावर सडकून टीका केली. पाकव्याप्त काश्मीरबाबत निर्णायक भूमिका न घेणं हे सरकारचं अपयश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पहलगाममध्ये दहशतवादी आलेच कसे? हल्ल्यानंतर पळून जाण्यास कोणी मदत केली? : गौरव गोगोईंचे संसदेत सवाल
सावंत म्हणाले की, “पाकव्याप्त काश्मीर हस्तगत करण्याची संधी असताना पंतप्रधानांनी बिनशर्त युद्धबंदी जाहीर का केली? मोदींनी इंदिरा गांधीप्रमाणे पाकिस्तानचे तुकडे केले असते, तर आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो. ‘घुसके मारेंगे’ ही फक्त घोषणाच राहिली, प्रत्यक्षात कारवाई झाली नाही, अशी टीका त्यांनी केली.
“मोदींच्या परराष्ट्र धोरणामुळे भारत एकटं पडलं आहे. सार्कमधील शेजारी देश भारताच्या बाजूने उभे राहिले नाहीत. इराणसारख्या पारंपरिक मित्रदेशासोबतही संबंध बिघडले. कॅनडाने विरोध केला आणि पाकिस्तानच्या बाजूला अमेरिका, चीन, तुर्कस्तान उभे राहिले. याला जबाबदार कोण?” असा सवाल त्यांनी केला.
त्यांनी पंतप्रधानांच्या भाषणशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं की, “ऑपरेशन सिंदूरनंतर त्यांनी टेलिप्रॉम्टरवरून इंग्रजीत भाषण केलं. हे जागतिक दर्शकांसाठी होतं का? देशात दहशतवादी मोकाट फिरत असताना ढोल बडवण्याचं काम केलं जातं.”
सावंत यांचा रोख पंतप्रधानांच्या संवेदनशीलतेवरही होता. “ते अजूनही पहलगामला किंवा मणिपूरला गेलेले नाहीत. त्यांची संवेदना कुठे आहेत?” असा सवाल करत त्यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केलं.
“आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून युद्धाच्या वेळीच पाकिस्तानला अब्जावधींची मदत मिळते, आणि आपण विरोध करूनही काही फरक पडत नाही. ही भारताची जागतिक स्तरावरील स्थिती दर्शवते, पाकिस्तानने युद्ध थांबवण्यासाठी आपल्यासमोर हातपाय जोडले, हे जगाला सांगायचं होतं. पण आमचे पंतप्रधान मात्र गप्प बसले,” अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.
शेवटी सावंत यांनी भारत-पाक क्रिकेट संदर्भातही आपली भूमिका स्पष्ट केली. “भारतावर दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं थांबवायला हवं,” असं ठाम मत त्यांनी यावेळी मांडलं.