काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांचे नैनिताल येथील घरावर अज्ञातांनी दगडफेककरत जाळपोळ केली आहे. सलमान खुर्शीद यांनी ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ हे पुस्तक लिहिले असून, त्यावरून वाद निर्माण झाला. त्यामुळे खुर्शीद यांच्या घरावर दगडफेक करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आगीत खुर्शीद यांच्या बंगल्याचा दरवाजा जळून खाक झाला असून अनेक खिडक्यांच्या काचाही तुटल्या आहेत. केअर टेकरने सहा राऊंड एरियल फायरिंग केल्याचा आरोपही केला आहे.
मीळालेल्या माहितीनुसार, जाळपोळ करणारे आणि दगडफेक करणारे हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप खुर्शीद यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे. मात्र, या हल्ल्यात भाजप कार्यकर्त्यांचा हात असल्याच्या आरोपाचे भाजप मंडल अध्यक्षांनी इन्कार केला आहे.
सलमान खुर्शीद यांनी फेसबुकवर त्यांच्या नैनितालच्या घरातील आगीचे आणि तुटलेल्या खिडक्यांचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दोन लोक त्यांच्या नैनितालच्या घराला लागलेली आग विझवताना दिसत आहेत. त्यांनी छायाचित्रांसोबतच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझ्या पुस्तकावर ज्या मित्रांनी प्रश्न उपस्थित केले त्यांच्यासोबत चर्चेसाठी माझ्या घराचे दरवाजे नेहमीच खुले असतील. पण तरीही हा हिंदू धर्म असू शकत नाही असे म्हणण्यात मी अजूनही चूक आहे का?
दरम्यान, सलमान खुर्शीद हे त्यांच्या सनराईज ऑफ अयोध्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनापासून हिंदुत्ववादी संघटनांच्या निशाण्यावर आहेत. या पुस्तकातील एक उतारा आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, “संत आणि ऋषीमुनींना अपेक्षीत असलेला हिंदू धर्म, नवीन हिंदुत्ववाद्यांच्या गटाने मागे ढकलले आहे, हे सर्व त्याच राजकीय विचारसरणीतून केले जात आहे, जी जिहादीशी जुळते आहे. ISIS आणि बोको हराम सारखे इस्लामी गट.”