
नवी दिल्ली : ‘वंदे भारत’च्या गतीचा आनंद लुटणाऱ्या भारतीयांना आता अमृत भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दि.30) दोन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवू शकतात. पुश-पुल तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या या ट्रेनचा सर्वसामान्यांना आणि स्थलांतरित मजुरांना सर्वाधिक फायदा होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.
नव्या गाड्यांमध्ये एसी आणि नॉन एसी असे दोन्ही डबे असतील, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी दिली. त्यांनी दिल्लीतील पहिल्या अमृत भारत ट्रेनची पाहणी केली. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्यास खूप मदत होईल, असे सांगितले. यासोबतच त्यांनी अमृत भारत ट्रेनबाबत सरकारची संपूर्ण योजना सांगितली की, या गाड्या संपूर्ण देशात चालवण्याची योजना आहे. आम्ही या गाड्या 4-5 महिने चालवू आणि कुठे सुधारणा आवश्यक आहेत ते पाहू. आतापर्यंत आम्ही विचार केला त्यापेक्षा चांगले निकाल आले आहेत. ज्याप्रमाणे आम्ही वंदे भारत गाड्या सर्व राज्यांमध्ये नेल्या, त्याचप्रमाणे या गाड्याही सर्व राज्यांना जोडतील.
काय आहे अमृत भारत एक्सप्रेस?
पूर्वी याला वंदे साधरण असेही म्हटले जात होते. दृष्यदृष्ट्या, ते सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारतशी डिझाइनच्या बाबतीत बऱ्याच प्रमाणात जुळते. त्याशिवाय त्यातही तशाच सुविधा देण्यात आल्या आहेत, पण त्यातही अनेक बदल करण्यात आले आहेत.