चारधाम यात्रेत एका महिन्यात १४ लाखांपेक्षा जास्त भाविक पोहोचले आहेत. भाविकांचे सर्व विक्रम मोडीत निघत आहेत. ७ महिन्यांपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत ३४ लाख भाविकांचा विक्रम आहे. २०१९ मध्ये तो झाला होता. त्यानंतर कोरोनामुळे दोन वर्षांपर्यंत केवळ सांकेतिक यात्रा झाली होती.
पहिल्यांदाच केदारनाथ धाम रस्ता पायी जाणाऱ्या यात्रेकरूंमुळे जाम झाला आहे. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धाम यात्रेच्या नोंदणीसाठी मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत. दुसरीकडे, अनेक लोकांना धामांवर थांबण्यासाठी हॉटेल किंवा होमस्टेमध्ये बुकिंग मिळेनाशी झाली आहे. प्रशासनाने आधीच स्पष्ट केले आहे की, राहण्याची व्यवस्था होत नसेल तर यात्रा टाळली पाहिजे. यामुळे यात्रेतील संभाव्य त्रास होणार नाही. उत्तराखंडचे पर्यटन सचिव दिलीप जवळकर यांनी सांगितले की, यावेळी यात्रेकरूंचा विक्रम मोडीत निघण्याची शक्यता आहे. दरम्यान, केदारनाथला ४,५२,५६७, बद्रीनाथला ४,८७,५३२, गंगोत्रीला २,६१,८६१, यमुनोत्रीला १,९३,९५३, हेमकुंडसाहिबला २०,७७५ अशा एकूण १४,१६,६८८ यात्रेकरूंनी भेट दिली आहे.
ऋषिकेशहून चारधामसाठी रोज हजारो वाहनांतून सुमारे ५० हजार यात्रेकरू रवाना होत आहेत. यामुळे दोन वर्षांपासून बेरोजगारीच्या झळा सोसणाऱ्या हजारो चेहऱ्यांवर हास्य फुलले आहे. उत्तराखंड पर्यटन विभागानुसार, यात्रा मार्गावर ५ हजारांपेक्षा जास्त व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. यात ढाबे, हॉटेल, होम स्टे, डिपार्टमेंटल स्टोअर, मेकॅनिक आदी असतात. एकूण ३० हजार लोकांना रोजगार मिळतो. कोरोनामुळे दोन वर्षांत हे सर्व ठप्प होते. काही कुटुंबे मूळ गाव सोडून शहरांत मजुरी करण्यासाठी आली होती. आता ती परतली आहेत.