मुंबई, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजारात पडझड झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये हाहाकार उडाला. मुंबई स्टॉक एक्स्चेंजचा (बीएसई) निर्देशांक 1170 अंकांनी घसरला आणि तो 58,465 वर स्थिरावला. तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही 348 अंकांच्या पडझडीसह 17,416 वर बंद झाला. या पडझडीसह बाजारात नोंदणीकृत कंपन्यांचे भांडवलातही 7.86 लाख कोटींची तूट झाली. गुरुवारी हेच भागभांडवल 269.20 लाख कोटी रुपये होते. आता ते 261.34 लाख कोटींवर खाली आले आहे.
[blurb content=”घसरता क्रम
12 नोव्हेंबर 59,919
16 नोव्हेंबर 60,322
17 नोव्हेंबर 60,008+
18 नोव्हेंबर 60,718
22 नोव्हेंबर 58,465″]
5 मिनिटात 500 अंकांची घसरण
सोमवारी सकाळी निर्देशांकाने 68 अंकांची किरकोळ झेप घेत 59,778 अंकावर व्यवसायास प्रारंभ केला होता. तथापि प्रारंभीच्या पाचच मिनिटात तब्बल 500 अंकांची पडझड झाली. त्यानंतर मध्यंतरात जवळपास 1625 अंकांच्या पडझडीमुळे निर्देशांक 58,011 च्या तळापर्यंत पोहोचला होता. दिवसभरात 475 अंकांची वाढ झाली आणि अखेरीस 1170 अंकाच्या तुटीसह तो स्थिरावला.
पेटीएमचे शेअर्स अर्ध्यावर
18300 कोटी रुपयांचा आयपीओ घेऊन बाजारात दाखल झालेल्या पेटीएमच्या गुंतवणूकदारांना सोमवारी जबर झटका बसला. कंपनीचे शेअर्स 44 टक्क्यांपर्यंत घसरले असून 1350.35 रुपयांपर्यंत घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना प्रती शेअर 800 रुपयांपेक्षा अधिक नुकसान सोसावे लागले आहे.