Photo Credit : X@ANI
रांची : झारखंडच्या चक्रधरपूरमध्ये आज (30 जुलै) सकाळी रेल्वे अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातानंतर घटनास्थळी बचावकार्यास सुरूवात करण्यात आली आहे. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले असून 20 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात येत असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. अपघातस्थळावरून प्रवाशांना नेण्यासाठी रेल्वेने विशेष कोचिंग रेक आणि बसेसची व्यवस्था केली आहे.
हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस, चक्रधरपूर विभागातील राजखरस्वान पश्चिम आऊटर आणि बारांबू दरम्यान रुळावरून घसरली. हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस रुळावरून घसरल्यानंतर रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
अपघातानंतरचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये अपघातानंतर ट्रेनच्या बोगी एकावर एक चढताना दिसत आहेत. बोगी रुळावरून घसरल्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. या अपघातात दीडशेहून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक प्रवासी घटनास्थळी मदतीची याचना करताना दिसले. सध्या एनडीआरएफसह इतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.
सरायकेला जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. जखमी प्रवाशांना बसमधून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी या मार्गावरील मालगाडी रुळावरून घसरल्याचे सांगण्यात आले. मेल एक्सप्रेस त्याच मालगाडीच्या डब्यांना धडकली आणि तिच्या 8-10 बोगी रुळावरून घसरल्या. वेगामुळे काही डबे एकमेकांवर आदळले तर काही डबे रस्त्याच्या कडेला उलटले.