उत्तर प्रदेश: पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करणाऱ्या एका व्यक्तीला उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक (UP ATS) ने लखनऊ येथून अटक केली आहे. संबंधित व्यक्ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करत असल्याचे आढळून आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. फिरोजाबाद जिल्ह्यातील हजरतपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत चार्जमन म्हणून कार्यरत असलेला रवींद्र कुमार असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही व्यक्ती फिरोजाबादमधील ऑर्डनन्स फॅक्टरीत चार्जमन म्हणून कार्यरत होता आणि भारताच्या सुरक्षा यंत्रणांबाबतची गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवत होता.
पाकिस्तानी गुप्तचर संस्था (ISI) परराष्ट्र मंत्रालय आणि भारत सरकारच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधत असल्याची माहिती UP ATS ला काही दिवसांपासून माहिती मिळाली होती. याशिवाय या एजंटने वेगवेगळी नावे आणि बनावट ओळखपत्रे वापरून भारतीय कर्मचाऱ्यांशी मैत्री वाढवली. भारतीय सैन्य आणि सरकारी संस्थांबाबतची संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी या कर्मचाऱ्यांना आर्थिक प्रलोभन दिले जात होते.
सखोल चौकशीनंतर, फिरोजाबाद जिल्ह्यातील हजरतपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत चार्जमन म्हणून कार्यरत असलेला रवींद्र कुमार हा गुप्त माहिती लीक करत असल्याचे युपी एटीएसच्या तपासात आढळून आले. रवींद्र कुमार याने फेसबुकवरून एका पाकिस्तानी एजंटशी संपर्क साधला होता, आणि त्याच्याशी मैत्री वाढवल्यानंतर संवेदनशील माहिती पाठवण्यास सुरुवात केली.
UP ATS ने पुरावे गोळा करून रवींद्र कुमार याला तात्काळ अटक केली आहे. ही माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचल्यास राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे अधिकाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक तपास सुरू केला आहे. पुढील तपासादरम्यान आणखी काही धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (UP ATS) प्राथमिक चौकशीनंतर रवींद्र कुमार याला लखनऊ मुख्यालयात आणले आणि सखोल तपास केला. तपासादरम्यान, त्याच्या फोनमध्ये पाकिस्तानी एजंटला पाठवलेले संवेदनशील आणि गोपनीय दस्तऐवज आढळून आले. त्यामुळे तातडीने त्याला अटक करण्यात आली.
Mahindra XUV 3XO चा EV व्हर्जन लवकरच मार्केटमध्ये होणार लाँच, मिळणार 400 KM ची रेंज
चौकशीत रवींद्र कुमारने तो 2006 पासून ऑर्डनन्स फॅक्टरीत कार्यरत असल्याचे सांगितले. 2009 पासून तो फिरोजाबादच्या हजरतपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत चार्जमन पदावर कार्यरत आहे.2024 च्या जून-जुलै महिन्यात फेसबुकद्वारे ‘नेहा शर्मा’ नावाच्या महिलेच्या संपर्कात आला. ही महिला प्रत्यक्षात पाकिस्तानी गुप्तचर संस्थेची एजंट होती. फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर दोघांमध्ये व्हॉट्सअॅप चॅट, ऑडिओ कॉल आणि व्हिडिओ कॉलवर संवाद सुरू झाला.
चौकशीत असे उघड झाले की, पाकिस्तानी एजंटने त्याच्याशी जवळीक वाढवली. हळूहळू, रवींद्र कुमारला मोठ्या पैशांचे आमिष दाखवण्यात आले आणि तो ऑर्डनन्स फॅक्टरीतील गोपनीय माहिती शेअर करू लागला.सध्या UP ATS अधिक तपास करत असून, रवींद्र कुमारकडून आणखी कोणती माहिती मिळाली आहे का, याचा शोध घेतला जात आहे.