अयोध्या : अयोध्येमधील राम मंदिर उद्घाटन (Ayodhya Ram Mandir Inauguration) सोहळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्यानगरी सजली आहे. यासाठी तब्बल 8 हजार पाहुण्यांना आमंत्रित केले असून आज प्रभू श्रीरामांच्या पहिल्या मूर्तीचे दर्शन (Prabhu Shri Ram First Look) देखील झाले आहे. या सोहळ्याची अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असली तरी या उद्घाटनाला शंकराचार्यांनी (Shankaracharya) विरोधी केल्याची चर्चा सर्वत्र रंगली. आता शंकराचार्याच्या या नकारावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री (CM Of UP) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘प्रभू श्रीरामांपेक्षा मोठे कोणीही नाही’ असे देखील योगी आदित्यनाश म्हणाले आहेत.
अयोध्यामधील राम मंदिराचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नसून बांधकामाधीन मंदिरामध्ये प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा करु नये, हे धर्मशास्त्राला धरुन नाही अशी भूमिका देशातील चार शंकराचार्यांनी घेतली होती. तरी देखील नरेंद्र मोदी मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी आग्रही असल्याने विरोधकांनी सडकून टीका केली होती. या प्रकरणावर राजकारण रंगल्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शंकराचार्यांच्या भूमिकेवर मत व्यक्त केले.
योगी आदित्यनाथ एका वाहिनीशी संवाद साधताना म्हणाले, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला शंकराचार्यांनी यायला हवे. आम्ही त्यांना सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. आज जो क्षण जवळ येऊन ठेपला आहे, तो श्रेयवादाचा किंवा मान-अपमानाचा नाही. मी असेन किंवा देशाचा सामान्य नागरिक असेल किंवा शंकराचार्य असतील, मात्र, कुणीही प्रभू श्रीरामांपेक्षा मोठा नाही. प्रभू श्रीरामांमुळे आपण आहोत, आपल्यामुळे प्रभू श्रीराम नाही. प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. त्यानुसार शंकराचार्यांनी त्यांचे म्हणणे मांडले आहे. ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नये. शंकराचार्यांनी सोहळ्याला उपस्थित राहिले पाहिजे, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले.