Uttar Pradesh CM Yogi Adityanath reaction to Kunal Kamra Controversial poem
मुंबई : राज्यामध्ये कॉमेडियन कुणाल कामरा याच्या कवितेमुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकारणावर आणि बंडखोरीवर विडंबनात्मक कविता सादर केली. मात्र यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते नाराज झाले. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. यामुळे हे प्रकरण चर्चेत आले असून कुणाल कामरा याने देखील माफी न मागण्याचा निर्णय घेतला आहे. कुणाल कामरा याच्या बाजूने ठाकरे गट उभा राहिला. राज्यातील या प्रकरणावर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या सुरु असलेल्या कुणाल कामरा गाण्याच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कुणाल कामरा याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ सांगितला आहे. कुणाल कामराच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे. या प्रकरणावर योगी आदित्यनाथ म्हणाले की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की कोणीही कोणावरही वैयक्तिक हल्ला करावा”, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. योगी आदित्यनाथ यांनी कुणाल कामरावरुन सुरु असलेल्या वादंगावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. योगी आदित्यनाथ म्हणाले की, “तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर इतरांवर वैयक्तिक हल्ले करण्यासाठी केला जाऊ शकत नाही. पण दुर्दैवाने काही लोक समाजात आणखी फूट पाडण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जन्मसिद्ध हक्क मानत आहेत”, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.
योगी आदित्यनाथ यांनी मुलाखतीमध्ये बुलडोझर कारवाईबाबत देखील स्पष्टीकरण दिले आहे. नागपूरमध्ये देखील दंगलीच्या प्रमुख आरोपी फहीम खान याच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली. याबाबत योगी म्हणाले की,”जे न्याय मानतात त्यांच्यासाठी न्याय होतो. जे कायद्याला आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर अनेकदा कायद्याच्या चौकटीमध्ये राहून त्यांना धडा शिकवणे गरजेचे आहे. जो ज्या भाषेमध्ये समजेल त्याला त्याच भाषेमध्ये समजवले पाहिजे. कोणी हिंसक बननू आपल्यासमोर हल्ला करण्यासाठी आलं आणि आपण त्याच्यासमोर याचना केली तर काय होणार आहे? त्याच्या हिसेंला उत्तर तर द्यावा लागणार ना,” असे मत योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्य़ाचबरोबर योगी आदित्यनाथ यांना औरंगजेबाच्या कौतुक करणाऱ्या अबु आझमी यांना उत्तर प्रदेशला या तुमचा उपाय करु असे थेट आव्हान दिले होते. याबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, “इतिहास सांगताना हे गुरु गोविंद सिंग, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, महाराणा सांगा यांचा सांगतात का? इतिहासाबाबत यांना काय माहिती आहे? हे लोक औरंगजेब आणि बाबरची पूजा करतात. कोणत्याही रोगाचे उपचारासाठी वेगवेगळे केंद्र असतात, तर युपी हे अशा लोकांना चांगले औषधपाणी देते. जशी त्यांची मागणी असेल त्या पद्धतीचा उपचार आम्ही देतो,” असा घणाघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.