Vaishno Devi Landslide: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माता वैष्णोदेवीच्या मार्गावर भूस्खलनाची घटना घडली आहे. कटरा ते वैष्णोदेवी मंदिर या १२ किलोमीटरच्या मार्गावर असलेल्या अद्धकुवारीजवळ झालेल्या या दुर्घटनेत ५ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर तात्काळ वैष्णोदेवीची यात्रा थांबवण्यात आली आहे.
सततच्या पावसामुळे भूस्खलन झाल्याने रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जवळपास १० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून, अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. वैष्णोदेवी मंदिराच्या परिसरातील भूस्खलनामुळे कटरा येथून सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.
या घटनेनंतर श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्डाने त्यांच्या ‘एक्स’अकाउंटवरून माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ भूस्खलनाची घटना घडली. यात काही लोक जखमी झाले असल्याची माहिती मिळाली असून, बचाव पथकांनी तात्काळ काम सुरू केले आहे.”
A landslide incident has occurred near Inderprastha Bhojnalaya at Adhkwari, some injuries are feared. Rescue operations are underway along with required manpower and machinery: Shri Mata Vaishno Devi Shrine Board pic.twitter.com/xf2EcqQVtt
— ANI (@ANI) August 26, 2025
यापूर्वी सकाळी हिमकोटी मार्गावरील यात्रा थांबवण्यात आली होती, मात्र जुन्या मार्गावरून यात्रा सुरू होती. नंतर भूस्खलनामुळे जुना मार्गही पुढील आदेश येईपर्यंत थांबवण्यात आला.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जम्मू विभागात नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सततच्या भूस्खलनामुळे डोंगराळ आणि सखल भागांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. २५० किलोमीटर लांबीचा जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
किश्तवाडमधील पॅडर रोड, रामनगर-उधमपूर आणि जंगलवाड-थथरी मार्ग यांसारखे अनेक महत्त्वाचे रस्तेही भूस्खलनामुळे आणि पुराच्या पाण्यामुळे बंद झाले आहेत. यापूर्वी डोडा जिल्ह्यात ढगफुटीमुळे अचानक पूर आला होता, ज्यामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद करावा लागला.