नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची (Presidential Election) रणधुमाळी सुरू असताना आता उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीची (Vice President) औपचारिक घोषणा झाली आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ६ ऑगस्टला मतदान होणार आहे. तसेच, त्याचदिवशी निकालही (Result) जाहीर होणार आहे.
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ५ जुलैला औपचारिक अधिसूचना निघेल. १९ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. त्यानंतर २० जुलैला अर्जांची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत २२ जुलै असणार आहे. त्यानंतर ६ ऑगस्टला निवडणूक होणार आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये दोन्ही सभागृहातील खासदार आणि सर्व विधानसभांच्या आमदारांनाही मतदानाचा अधिकार आहे. मात्र, उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये केवळ संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार मतदान करतात. विशेष म्हणजे राष्ट्रपती नियुक्त खासदारांनाही या निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे.