नवी दिल्ली : आर्थिक घोटाळे (Financial Scam) करून देशाबाहेर पळून गेलेल्या पळपुट्या घोटाळेबाजांना कंगाल करण्याची ठोस योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आखली आहे. या योजनेची व्याप्ती इतकी मोठी आहे की, त्याचा प्रभाव सातासमुद्रापारही होईल. भारतीयांचे कष्टाचे पैसे घेऊन पळून गेलेले हे आर्थिक फरार गुन्हेगार स्वतःच देशात परत येतील. याबातच्या योजनेची माहिती पंतप्रधानांनी भ्रष्टाचारविरोधी जी 20 मंत्री गटाच्या मेळाव्यात सांगितली.
सरकार आक्रमकपणे आर्थिक गुन्हेगारांचा पाठपुरावा करत आहे. सरकारने संसदेत एक नवीन विधेयक भारतीय न्यायिक संहिता – सादर केले असून, हे विधेयक पारित होताच फरार गुन्हेगारांच्या देश-विदेशातील मालमत्ता जप्त करण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीसारख्या पळपुट्या गुन्हेगारांची धाकधूक वाढणार आहे.
पंतप्रधान म्हणाले की, अशा प्रकारच्या जप्तीमुळे आर्थिक गुन्हेगारांच्या विदेशी संपत्तीच्या पुनर्प्राप्तीला वेग येईल. यामुळे योग्य न्यायिक प्रक्रियेनंतर गुन्हेगारांचे देशात परतणे आणि प्रत्यार्पण होण्याचा मार्ग मोकळा होईल.