CJI Bhushan Gavai Attack News:
देशाला मान खाली घालायला लावणारी अशी लाजिरवाणी घटना आज समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर आज भर न्यायालायात बूट फेकण्याचा प्रयत्न कऱण्यात आला. ही घटना काही वेळातच संपूर्ण देशभरात पसरली. एका ज्येष्ठ वकिलानेच थेट सीजेआय भूषण गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला अडवले, या आरोपी वकिलाचे नाव राकेश किशोर असे समोर आले आहे. आरोपी वकील राकेश किशोर हे वय ६० वर्षांचे आहे. राकेश किशोर यांची २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या बारमध्ये नोंदणी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालय क्रमांक १ मध्ये न्यायालयीन कामकाज सुरू असताना ही घटना घडली. एका खटल्यावर कामकाज सुरू असताना राकेश किशोर यांनी थेट भूषण गवई यांच्यावर बुट फेकण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. किशोर यांना घेऊन जात असताना “आम्ही सनातनचा कोणताही अपमान सहन करणार नाही.” असे म्हणत त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. पण सरन्यायाधीशांनी या घडल्या प्रकारावर प्रतिक्रिया दिली नाही आणि न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलांना त्यांचे युक्तिवाद सुरू ठेवण्यास सांगितले.
खजुराहोमध्ये भगवान विष्णूच्या सात फूट उंच, शिरच्छेदित पुतळ्याच्या जीर्णोद्धाराशी संबंधित मागील प्रकरणात सरन्यायाधीश गवई यांनी दिलेल्या टिप्पण्यांमुळे हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. १६ सप्टेंबर रोजी, सर्वोच्च न्यायालयाने खजुराहो येथील ज्वारी मंदिरातील भगवान विष्णूच्या सात फूट उंच मूर्तीची पुनर्बांधणी आणि पुनर्स्थापना करण्याचे निर्देश मागणारी याचिका फेटाळून लावली. याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने ती प्रसिद्धी याचिका असल्याची टिप्पण्णीही त्यांनी केली.
तसेच, याचिका फेटाळून लावताना त्यांनी म्हटले होते की, “जा आणि देवाला काहीतरी करायला सांगा. तुम्ही म्हणता की तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहात. मग आत्ताच जाऊन प्रार्थना करा. हे एक पुरातत्वीय स्थळ आहे आणि एएसआयने परवानगी द्यावी लागते. अशी प्रतिक्रीया सीजेआय यांनी दिली होती. या गोष्टीचा राग मनात धरुन राकेश किशोर यांनी सीजेआय यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण या हल्ल्यानंतरही सीजेआय गवई उपस्थित वकिलांना म्हणाले की, “या सर्व गोष्टींमुळे विचलित होऊ नका. आम्ही विचलित झालो नाही. या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होणार नाही.”
भूषण गवईंच्या या टिप्पणीने सोशल मीडियावर गोंधळ उडाला. अनेकांनी सरन्यायाधीशांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. दोन दिवसांनंतर न्यायालयात, या खटल्यासंदर्भात बोलताना सरन्यायाधीश गवई म्हणाले की, माझा अनादर करण्याचा कोणताही हेतू नव्हता. मी सर्व धर्मांचा आदर करतो. हे सोशल मीडियावर घडले.” केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीशांचे समर्थन करत, सोशल मीडियावर घटनांवरील प्रतिक्रिया अनेकदा अतिशयोक्तीपूर्ण असतात.’ अशी प्रतिक्रीया दिली.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा देशभरातील न्यायव्यवस्थेशी संबंधित वर्तुळांतून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. वरिष्ठ वकील आणि कायदेतज्ज्ञांनी आरोपी वकिलावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे की, “या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. आरोपी वकिलावर तातडीने कायदेशीर कारवाई केली पाहिजे. हा भारताच्या सर्वोच्च न्यायालयावर झालेला जातीयवादी हल्ला असल्याचे स्पष्ट दिसते. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या हल्ल्याचा निषेध करावा आणि हे स्पष्ट करावे की न्यायालय वैचारिक हल्ले सहन करणार नाही. न्यायालयाच्या प्रतिष्ठेचे रक्षण करत, सरन्यायाधीश गवई यांनी कोणत्याही व्यत्ययाशिवाय न्यायालयीन कर्तव्ये पार पाडल्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे.”