दिल्लीच्या निवडणुकांमध्ये ऑटो ड्रायव्हर्सना इतकं महत्त्व का? यावेळीही ठरणार का गेमचेंजर?
दिल्ली विधानसभा निवडणुकांची घोषणा अद्याप झालेली नाही, तरी आम आदमी पक्षाकडून त्याआधीच जोरदार तयारी केली जात आहे. अरविंद केजरीवाल यांनी ७० पैकी ३१ उमेदवारांची घोषणा केली आहे. तर विद्यमान आमदारांची तिकीटे कापून धक्का दिला आहे. आता दिल्लीच्या निवडणुकांमध्ये गेमचेंजर मानल्या गेलेल्या रिक्षा चालकांसाठी मोठ्या गॅरंटी दिल्या आहेत. त्यामुळे यावेळीही रिक्षा चालक गेम चेंजर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या रिक्षा चालकांचा दिल्लीचं राजकारण आणि आम आदमी पक्षासोबत नक्की काय संबंध आहे, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून.
जानेवारी २०१३ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिखरावर होता. याच दरम्यान 10 हजार रिक्षा चालकांच्या ‘न्याय भूमी’ या संघटनेने एक वर्ष जुन्या आम आदमी पक्षाला समर्थन देण्याची घोषणा केली. त्यामुळे दिल्लीच्या निवडणुकीचा रुखच बदलला होता.
ऑटो चालक निवडणुकांचीच्या रिंगणात उतरण्यामुळे आम आदमी पार्टीच्या प्रचारात गती आली. रिक्षांमधून गल्लीपासून मुख्य रस्त्यांपर्यंत अरविंद केजरीवाल यांच्या विचारांची आणि गाण्यांची धून ऐकू येऊ लागली. याचा फायदा पार्टीला विधानसभा निवडणुकीत झाला आणि 70 जागांच्या दिल्ली विधानसभामध्ये पहिल्याच प्रयत्नात आम आदमी पक्षाला 28 जागांवर विजय मिळाला.
त्यावेळी केजरीवाल यांचं सरकार फक्त 49 दिवसच टिकलं. 2015 मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या, तेव्हा ऑटो चालक एकदा पुन्हा मैदानात उतरले. यावेळी ऑटो चालकांची संख्या हजारोंपासून लाखोंमध्ये वाढली होती. निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागला आणि आम आदमी पार्टीने 67 जागांवर विजय मिळवला.
दहा वर्षांनंतर, अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा ऑटो चालकांना पक्षाशी जोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना एंटी इनकंबेन्सी संपवण्याच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. काही दिवसांपूर्वी, आम आदमी पार्टीने केलेल्या सर्वेक्षणानंतर, नकारात्मक फीडबॅक असलेल्या काही आमदारांची तिकीटं कापली आहेत.
दिल्लीमध्ये कितीततरी ऑटो ड्रायव्हर्स असोसिएशन्स सक्रिय आहेत आणि ऑटो ड्रायव्हर्सची संख्या सुमारे एक लाख आहे. सीएसडीएसच्या सर्वेक्षणानुसार, ऑटो ड्रायव्हर्स आणि या व्यवसायाशी संबंधीत असलेल्या नागरिकांचं ४ टक्के मतदान आहे. ऑटो ड्रायव्हर्स निवडणुकीत फीडबॅक घेण्याचं महत्त्वाचं माध्यम बनले आहेत. ते प्रवाशांकडून मुद्दे, नेत्यांबद्दल माहिती घेतात आणि ती माहिती संबंधित नेत्यांपर्यंत पोहोचवतात.ऑटो ड्रायव्हर्स प्रचाराचं सुद्धा काम करतात. ते ज्या पक्षाचा किंवा नेत्याचा पाठिंबा देतात, त्यांच्यासाठी लोकांमध्ये वातावरण तयार करतात आणि आपल्या ऑटोवर लावून पोस्टर प्रचार करतात.
ऑटो ड्रायव्हर्सचा मुख्यत: दिल्लीच्या शहादरा, पंजाबी बाग, कोंडली, सराय काले खान, संगम विहार आणि बुराड़ी या भागात मोठा प्रभाव आहे. यापूर्वी, अनेक ऑटो ड्रायव्हर्स पंजाबमधून होते, पण आता बिहार आणि उत्तर प्रदेशातील ड्रायव्हर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करून ५ गॅरंटीची घोषणा केली आहे. दिल्लीमध्ये पुन्हा सरकार आल्यावर 5 गॅरंटी लागू केल्या जातील. यामध्ये प्रत्येक रिक्षा चालकाला 10 लाख रुपयांचा जीवन वीमा, 5 लाख रुपयांचा अपघाती विमा, मुलींच्या लग्नासाठी 1 लाख रुपयांची मदत आणि वॉर्डी साठी 5000 रुपयांची मदत यांचा समावेश आहे. याशिवाय दरवर्षी रिक्षा चालकाच्या ड्रेससाठी ५ हजार रुपये, सर्व ऑटो ड्रायव्हर्सच्या मुलांसाठी सरकारी खर्चावर कोचिंग सुविधा दिली जाईल, असं आश्वासन केजरीवाल यांनी दिलं आहे.
दिल्लीमध्ये ऑटो ड्रायव्हर्सचा मुख्य प्रश्न म्हणजे ट्रॅफिक नियमांचे नियमितीकरण आणि ई-रिक्षांची वाढती संख्या. यामुळे ऑटो ड्रायव्हर्सला नियमित प्रवासी मिळवण्यात अडचणी येत आहेत. महिलांसाठी फ्री बस सेवा सुरू झाल्यामुळे सुद्धा रिक्षा व्यवसायावर परिणाम झाला आहे. याशिवाय हेल्थ इंन्शुरन्स ही एक महत्त्वाची मागणी आहे, आणि केजरीवाल यांनी निवडणुकीपूर्वीच या या पाच गॅरंटी देऊन निवडणुकीत आघाडी घेतली आहे.
जानेवारी किंवा त्यानंतर दिल्ली विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याची आतापासूनच जोरदार तयारी सुरू आहे. आप आणि अरविंद केजरीवाल यांना यावेळची निवडणूक तशी सोप असणार नाही. भाजपळी प्रत्यक्ष सामना करावा लागणार आहे. दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी 36 आमदारांची आवश्यकता आहे आणि चौथ्यावेळी तिल्लीवर आपचा झेंडा फडकवण्याचं लक्ष्य केजरीवाल यांचं असणार आहे.