कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचा विधानसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गाणे गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.त्यांच्या या गाण्यावरून त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीकाही झाली. या वादावरून त्यांनी आज ( २६ ऑगस्ट) माध्यमांशी संवाद साधत यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ” आपण आरएसएसची स्तुती करण्यासाठी नाही तर आर. अशोक यांना आव्हान देण्यासाठी हे गाणे गायले होते. असे स्पष्टीकरण डी.के. शिवकुमार यांनी दिले आहे.
शिवकुमार म्हणाले, “जर माझ्या टिप्पणीमुळे कोणाचे मन दुखावले असेल तर मी माफी मागतो, परंतु ही माफी कोणत्याही राजकीय दबावाखाली नाही. राजकीय फायदा मिळवण्यासाठी माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. जनतेमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
२१ ऑगस्ट रोजी डीके शिवकुमार यांनी विधानसभेत ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ या आरएसएसच्या प्रार्थना गीताच्या काही ओळी गायल्या. त्यानंतर काँग्रेसशी त्यांच्या मतभेदाच्या अटकळांना वेग आला. ते कधीही भाजपमध्ये जाण्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या.
Maratha Reservation : मराठा आंदोलनाला हाय कोर्टाचा लगाम; तरीही मनोज जरांगे पाटील मुंबईत येण्यावर ठाम
डी.के. शिवकुमार यांनी हा वाद बाजूला ठेवून त्यांच्या राजकीय श्रद्धेवर भर दिला. शिवकुमार म्हणाले की, कोणीही गांधी कुटुंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. मी जन्मतः काँग्रेसी आहे आणि काँग्रेसी म्हणून मरेन. गांधी कुटुंब माझे दैवत आहे आणि मी त्यांचा भक्त आहे. असंही शिवकुमार यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी असलेल्या त्यांच्या तीन दशकांच्या सहवासाची आठवण करून दिली.
काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी नुकत्याच दिलेल्या वक्तव्यात काँग्रेस पक्षाशी असलेल्या आपल्या निष्ठेचा पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. त्यांनी आपल्या वैयक्तिक आणि राजकीय संघर्षांची आठवण करून दिली.
Vande Bharat Express: आता नांदेड ते मुंबई प्रवास 9 तासांत पार! एक्सप्रेसचे थांबे कुठे? जाणून घ्या
शिवकुमार म्हणाले की, एकदा सरकार संकटात असताना मी सुमारे २०० आमदारांना एकत्र करून सरकार वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच तिहार तुरुंगात घालवलेल्या काळाचा, तसेच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या खटल्यांचा उल्लेख केला. अशा कठीण काळातही पक्षाचा त्याग न करता काँग्रेसशी निष्ठा टिकवून ठेवली, हे त्यांनी ठामपणे सांगितले. महात्मा गांधींच्या १०० व्या जयंतीनिमित्त १०० काँग्रेस भवनांची उभारणी करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता. या भवनांना त्यांनी “पक्षाचे मंदिर” असे संबोधले.
शिवकुमार यांचे हे विधान केवळ त्यांच्या वैयक्तिक निष्ठेचे प्रतीक नसून, काँग्रेसमधील त्यांची मध्यवर्ती भूमिका आणि गांधी कुटुंबाशी असलेल्या नात्याचेही प्रतिबिंब आहे. कर्नाटकच्या राजकारणात त्यांचे महत्त्व पूर्वीपासून मान्य आहेच, पण अशा विधानांमुळे राष्ट्रीय राजकारणातही त्यांचा दबदबा अधिक दृढ होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षातल्या अंतर्गत वादांवरही त्यांनी मात केल्याचा संदेश जातो.