Punjab Police
चंदीगड : सध्या देशातील अनेक शहरांमध्ये अंमली पदार्थ तस्करांचे जाळे पसरत आहे. त्यावरून आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कडक इशारा दिला आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फ केले जाईल आणि तस्करांची मालमत्ता जप्त केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री मान यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘पोलिस विभागात लवकरच सुधारणा दिसून येईल. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. आम्हाला या गोष्टी कुठून आल्या आणि कुठे पोहोचवल्या जाणार होत्या, पोलिसांचे तस्करांशी साटेलोटे होते का याचा तपास केला जाणार आहे.
तसेच एकाच पोलिस ठाण्यात अधिकारी 10 वर्षांहून अधिक काळ काम करत असेल तर याचाच अर्थ ‘पक्षपाती’ कारभार सुरू आहे. खालच्या दर्जाचे पोलीस अधिकारी आणि अंमली पदार्थांचे तस्कर यांच्यात ‘नेक्सस’ असल्याचा दावा केला. राज्य पोलीस प्रमुखांना त्याच पोलीस ठाण्यात नेमलेल्या अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करण्यास सांगितले आहे.