कोल्हापूर : पक्षाविषयी, मातोश्रीविषयी काहीही बोलू नको, लायकीत राहा. मुंबईत कुठेही या शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ असं आव्हान शिवसेनेचे कोल्हापूरचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून (Kirit Somaiya) ठाकरे कुटुंबीयांवर होत असलेल्या आरोपानंतर राजेश क्षीरसागर यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
राजेश क्षीरसागर म्हणाले, केंद्राचं संरक्षण घेऊन फिरण्यापेक्षा मुंबईत कुठेही या शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ. सोमय्या ही मूर्ख व्यक्ती आहे. त्यांची लायकी शिवसेनेने दाखवून दिली आहे. ईडीचे शस्त्र काढून राज्यभरात फिरत आहेत. मात्र, लक्षात ठेवा केंद्रातील भाजपची सत्ता गेल्यावर परदेशात पळून जायची वेळ येईल, असेही म्हणाले.
सोमय्यांनी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सोमय्यांनी ‘मातोश्री’वर गंभीर आरोप केले होते. त्याची परिणीती म्हणून शिवसेनेने सोमय्यांचं तिकीट कापण्यासाठी भाजपला मजबूर केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा शिवसेना-भाजप वेगळे झाल्यानंतर सोमय्यांनी पुन्हा टार्गेट ‘मातोश्री’ केलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावरही घोटाळ्याचे आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये १९ बंगल्यांचा घोटाळा केला. त्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. उद्धव ठाकरेंची दडपशाही सुरु आहे, असे आरोप सोमय्यांनी केला आहे. पण त्यांनी चुकीचे पध्दतीने केलेले आरोप त्यांना महागात पडतील, असा इशाराही दिला.