
आपल्या देशातले शेतकरी शक्यतो नियोजित पद्धतीने शेती करीत नाहीत. कारण मुळात असे नियोजन करावे लागते याची जाणीव नाही. त्याचबरोबर शेती नियोजनबद्धपणे करण्याचे ठरवले तरी त्यात अनेक अडथळे येतात. निसर्गाची अडचण असतेच, पण नियोजनबद्ध शेतीमध्ये पैशाची अडचण सुद्धा मोठ्या प्रमाणावर येते. त्यामुळे कोणत्या हंगामात नेमकी कोणती पिके घ्यावीत याचे फार काटेकोर नियोजन करणे त्यांना जमत नाही. त्यामुळे ज्या पिकांची लागवड करण्याआधी काही विशिष्ट दिवस पूर्वी रोपे टाकावी लागतात त्या पिकांची लागवड करण्यासाठी आवश्यक अशी रोपे टाकलेली नसतात. कोणत्याही पिकाचे किमान दीड महिना आधी नियोजन केले तर स्वत:च स्वत:ची रोपे तयार करता येतात आणि तीच रोपे वापरून पीक घेता येते. मिरची, टोमॅटो, कांदा यांची रोपे अशी टाकावी लागतात. परंतु बहुसंख्य शेतकरी नियोजन करीत नसल्यामुळे ते दुसऱ्यांच्या रोपांवर अवलंबून राहतात. अशा शेतकऱ्यांना रोपे पुरविण्याच्या निमित्ताने काही शेतकरी नर्सरी किंवा रोपवाटिका हा व्यवसाय करू शकतात. या व्यवसायामध्ये उत्पन्न फर चांगले मिळते. कारण ऐनवेळी रोपांची मागणी करणारा शेतकरी वाट्टेल ती किंमत देऊन रोपे विकत घेत असतो.
आपली परिस्थिती सुधरून घेतलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांचे निरीक्षण केले असता त्यातले बहुसंख्य शेतकरी रोपे विकून श्रीमंत झाल्याचे दिसते. असा हा शेतकऱ्यांना श्रीमंत करणारा व्यवसाय आहे. यामध्ये काही नाममात्र किंमतीचे बी आणून त्याची रोपे तयार करून ती चांगल्या किंमतीला विकता येतात. मात्र हे करताना रोप विकणाऱ्यांची विश्वासार्हता फर महत्त्वाची असते. लोकांचा रोप विकणाऱ्यांवर विश्वास असेल तर त्याच्याकडून चार पैसे जास्त घेऊन रोपे विकत घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. कारण शेवटी शेतकर्याचे उत्पन्न रोपावर अवलंबून असते. तेव्हा ही विश्वासार्हता निर्माण करून रोपवाटिकेचा व्यवसाय करताना तो करणाऱ्या शेतकऱ्यांनी चांगले बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांचा फयदा होईल अशीच रोपे तयार केली पाहिजे. हा एक प्रकारे शेतकऱ्यांची चांगली सेवा करण्याचा प्रकार आहे. लोकांच्या शेतीच्या प्रगतीला आपण या मार्गाने हातभार लावू शकतो. बऱ्याच शेतकऱ्यांना मिरचीची लागवड कशी करावी माहीत असते. ते मिरचीची जोपासनाही चांगली करतात, परंतु अधिक उत्पन्न देणाऱ्या आणि प्रगत बियाणांची माहिती त्यांना नसते. त्यामुळे ते स्वत:चे रोप स्वत: तयार करत नाहीत.
तेव्हा अशा शेतकऱ्यांचा गैरफायदा घेऊन त्यांना कुठल्यातरी हलक्या जातीचे बी आणून त्याची रोपे महागात विकण्याची प्रवृत्ती काही रोपवाटिकांच्या मालकात दिसते. असे न करता चार पैसे जास्त लागले तरी हरकत नाही, पण चांगल्या जातीचे बियाणे आणून ती रोपे शेतकऱ्याला पुरवली पाहिजेत. भाजीपाल्याच्या रोपांची अशी विक्री करता येते. त्याचप्रमाणे फळझाडे आणि फुलझाडे यांचीही रोपे विकून चांगला पैसा कमवता येतो. त्यांची माहिती पुढच्या लेखात पाहू. असाच फळझाडांची आणि फुलांची रोपे विकण्याचाही व्यवसाय नर्सरीत केला जातो. उलट भाजीपालांच्या रोपांपेक्षा फळांची आणि फुलांची कलमी रोपे अधिक किंमतीने विकली जातात आणि त्यातून रोपांच्या विक्रीपेक्षा अधिक फायदा होतो. भाज्यांच्या रोपांपेक्षा आज खऱ्या अर्थाने फळांच्या आणि फुलांच्या रोपांची नर्सरी अधिक गरजेची ठरली आहे. आपल्या देशामध्ये फळझाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे. असे असले तरी फळांची चांगली रोपे कोठे मिळतात, याची लोकांना माहिती नसते आणि फळांची बाग लावताना कोणत्या जातीचे रोप लावले जात आहे याला नितांत महत्त्व असते. कारण फळझाडाची जात निवडताना थोडी जरी चूक झाली तरी पुढे त्यातून होणारे नुकसान कायमचे ठरत असते आणि ते लाखो रुपयांचे असते.
त्यामुळे शेतकऱ्यांनी फळझाडांची लागवड करताना रोपे विकत घ्यायचे असतील तर भारी चौकशी करून ती घेतली पाहिजेत. अन्यथा केवळ शेतकऱ्यांचेच नव्हे तर देशाचेही नुकसान होत असते आणि रोपवाटिका तयार करून त्याचा व्यवसाय करणाऱ्या लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवून उत्तम रोपे तयार केली पाहिजेत आणि त्याबाबतीत विश्वासार्हता निर्माण केली पाहिजे. रोपांची निवड चुकली तर आपले नुकसान होते याची जाणीव शेतकऱ्यांनाही असते. त्यामुळे चार पैसे जास्त गेले तरी हरकत नाही, पण विश्वासार्ह रोपवाटिकेतून आणि तज्ञ व्यक्तीकडूनच निवड करून ते रोपे खरेदी करत असतात. रोप वाटिका करणाऱ्या व्यावसायिकांनी या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे. अशीच स्थिती फुलझाडांचीही असते. फुलांना सुद्धा चांगले पैसे मिळू शकतात. कोणती फुलझाडे लावावीत, कोणत्या जातीची लावावीत याची पुरेशी माहिती अजून आपल्याकडे उपलब्ध नाही. कारण आपल्याकडे फुलशेतीची परंपराही नाही आणि जे काही मोजके लोक फुले लावतात ते लोक परंपरेने चालत आलेल्या फुलांचीच लागवड करतात.
सध्या फुलांच्या अनेक जाती विकसित झाल्या असून त्यांना पैसेही छान मिळायला लागले आहेत. अशा फुलांची रोपे विक्री करण्याचा व्यवसाय करून हजारो लोक पैसा कमवत आहेत. परंतु हे लोक बहुतेक करून परप्रांतातले आहेत. महाराष्ट्रात फुलांची रोपे विकण्याचा व्यवसाय म्हणावा तेवढा होत नाही. या क्षेत्रामध्ये मराठी शेतकर्यांना फार मोठी संधी आहे. मात्र ती साधण्यासाठी फुलझाडे आणि फळझाडे यांचा अभ्यास करण्याची गरज आहे.