अनेक भागांत मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात; भंडाऱ्यात केवळ 'इतके' विद्यार्थी शाळाबाह्य
भंडारा : सध्या शिक्षण हे अत्यंत गरजेचे बनले आहे. काही विद्यार्थ्यांना शिक्षण मिळतं तर काही विद्यार्थी याच शिक्षणापासून दूर राहत असल्याचे दिसून आले. जिल्हा परिषद शिक्षण विभागाद्वारे १ ते १५ जुलै या कालावधीत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात आले. यामध्ये एकूण ३६ शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आले. त्यात १५ मुले आणि २१ मुलींचा समावेश आहे. तर ३९ बालके ही स्थलांतरित असून, ते शाळा प्रविष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात ३६ बालके ही प्रत्यक्षात शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास आले. एकाचा अपवाद वगळता उर्वरीत ३५ बालकांना शाळेत सामावून घेण्यात आले आहे. शाळेत जाऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भंडारा तालुक्यात सर्वाधिक आहे. इतर तालुकामध्ये हा आकडा तुलनेने कमी आहे. भंडारा तालुक्यात शाळेत कधीच न गेलेल्या ई-१ गटांतील विद्यार्थ्यांमध्ये ४ मुले व ७ मुली असे एकूण ११ जण आहेत. तर ई-२ गटांत अनियमित शाळेत जाणारे ११ मुले व १३ मुली असे एकूण २४ जण आढळून आले.
दरम्यान, भंडारा हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, येथे उदरनिर्वाहाच्या शोधात बाहेर जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातूनही मजूरवर्ग येतो. भटक्या समाजाच्या काही वस्त्यासुद्धा असून, या वर्गातील लहान मुले शाळेत जाण्याचे प्रमाणही नगण्य आहे. शाळेत नाव नोंदवूनही ही मुले नियमित शाळेत जात नाहीत. त्यातील अनेक मुले आई-वडिलांना घरकामात तसेच व्यवसायात हातभार लावतात.
कौटुंबिक जबाबदारीमुळे मुले शिक्षणापासून वंचित
कौटुंबिक जबाबदारीमुळे ही मुले शिक्षणापासून दुरावल्याचे दिसून येते. सध्या रस्ता बांधकामावर स्थलांतरित मजूर आहेत. या बालकांचा शोध घेत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या मोहिमेद्वारे होत आहे. मोहिमेत आढळून आलेल्या सर्व बालकांना शाळेत दाखल करण्यात आले असून त्यांच्या पालकांकडून हमीपत्र भरून घेण्यात आले आहे.
शिक्षण हक्क कायदा केवळ कागदावर
जिल्ह्यातील सर्वेक्षणात एकूण ३६ शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आले. दरम्यान २०२४-२५ या शैक्षणिक सत्राचे शुल्क न भरल्यामुळे एक विद्यार्थी ई-२ या श्रेणीत शाळाबाह्य असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शाळेचे शुल्क न भरल्यामुळे त्याला शाळेने प्रवेश नाकारला आहे. या प्रकरणात शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली होत असल्याचे दिसते. शिक्षण विभागाने त्याला शाळाबाह्य दाखविले असले तरी त्याच्या प्रवेशाबाबत काय भूमिका घेतली जाते हे महत्वाचे ठरणार आहे.