प्रत्येक भारतीयाचा सर्वोच्च आनंदाचा ‘सण’ म्हणजे दिवाळी! गरीब असो वा श्रीमंत; प्रत्येकाने हा क्षण, सण जगलेला असतो. बालपणापासून वार्धक्यापर्यंतच्या अनेक आठवणी या दिपोत्सवाच्या आनंदाशी जोडलेल्या असतात. मग आपले क्रिकेटपटू तरी याला अपवाद कसे असणार? मात्र लहानपणी उपभोगलेले दिवाळीच्या आठवणींचे, अत्यानंदाचे क्षण ऐन तारुण्यात क्रिकेटशी नशिब जोडले गेल्यामुळे हवे तसे उपभोगता येत नाहीत. त्यातूनही कोणत्याही देशात असोत, देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात असूद्यात क्रिकेटपटू दिवाळीचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करतात. घरापासून दूर असल्यामुळे आप्तस्वकियांना ते ‘मिस’ करतातच; पण सोबत दिवाळीची रोषणाई, दिव्यांची आरास, रंगीबेरंगी कंदिल, मोहक रांगोळ्या आणि जिव्हातृप्त करणारा दिवाळीचा खास फराळ, या गोष्टीही हुकल्याचे दु:ख अधिक असते.
सुनील गावसकर असोत, दिलीप वेंगसरकर असोत, प्रवीण अमरे असोत, लालचंद राजपूत असोत, किंवा रणजीपटू सुलक्षण कुलकर्णी असोत, सर्वांनाच दिवाळी घरात साजरी न करता आल्याचे दु:ख जाणवतेच.
याबाबत आपला अनुभव सांगताना दिलीप वेंगसरकर म्हणत होते, ‘मी खेळायचो, त्यावेळी दौरे आताप्रमाणे सलग लागून नसायचे. पण ऐन दिवाळीतच इराणी करंडकचा सामना असायचा. भारतीय संघासाठीचा तो निवड चाचणी सामना, म्हणजे अतिशय महत्त्वाचा सामना असायचा. त्यामुळे कोठेही असोत, जाणे हे आलेच.’
घरचे दिवाळी साजरी करीत असताना आम्ही मात्र कुठल्या तरी कोपऱ्यात क्रिकेट खेळत बसायचो. काही ठिकाणी तर आपल्याप्रमाणे वातावरणही नसायचे. मग तर आपल्या दिवाळीची प्रकर्षाने आठवण यायची. मात्र परदेशात, जेथे भारतीय लोक रहातात तेथे आम्ही गोडधोड खायचो. फटाके वाजवायचो.
दिलीप वेंगसरकर म्हणत होते, ‘मला आठवतंय एकदा पाकिस्तान दौऱ्यावर असताना दिवाळी होती. सामना इस्लामाबादला होता. त्यावेळी भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी कसोटीच्यावेळी दिवाळीचा आनंद आम्हाला देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी दिव्यांची आरास करण्यात आली होती. फुलबाजे लावायला देण्यात आले होते. आमच्यासाठी मेजवानी ठेवण्यात आली होती. मात्र फराळ नव्हता. पाकिस्तानात आपला फराळ कुठे मिळणार?’
दिलीप म्हणत होता, ‘दिवाळीत परदेशात फटाके मिळतील, दिवे मिळतील पण फराळ कुठेच मिळत नसायचा. त्यावेळी मला आईची आठवण यायची. कारण माझी आई उत्तम फराळ करते. तिच्या चकल्या, अनारसे यांच्या चवीची कुठेच बरोबरी होऊ शकत नाही.’
प्रवीण अमरे यांचा अनुभव थोडा वेगळा आहे. ते म्हणत होते माझी कारकिर्द तेवढी मोठी नाही, पण जेथे गेलो तेथे भारतीयांनी नेहमीच आपल्या पदार्थांच्या पाहुणचाराने कायम सरबराई केली.
सुलक्षण कुलकर्णी आणखीच वेगळे सांगत होते. ते म्हणत होते, दिवाळी असताना आम्ही कुठेतरी, भिलाई किंवा तशा ठिकाणी सामना खेळत असायचो. त्यावेळी ‘होमसिक’ व्हायचो. दिवाळी प्रचंड ‘मिस’ करायचो. इतर सर्वजण फराळ खाताहेत, फटाके फोडताहेत आणि आम्ही येथे कुठे येऊन पडलो आहोत असं वाटायचं. एकाकी वाटते. मात्र एक चांगली आठवणही आहे. आम्ही भिलाईला दुलीप ट्रॉफी फायनल खेळत होतो. ऐन दिवाळीत सामना होता. मी, संजय मांजरेकर, राजू कुलकर्णी, लालचंद राजपूत असे आम्ही मुंबईचे चौघेजण होतो. भिलाई अशी जागा आहे, तेथे आपल्यासाठी काहीच ‘लाईफ’ नाही. काय करायचे असे आम्ही विचार करीत होतो. त्यावेळी तेथे एक मराठी कुटुंब भेटले. ते भिलाईतच रहायचे. त्यांनी आम्हाला चौघांना दिवाळीत घरी येण्याचे आमंत्रण दिले. आम्हाला सुखद धक्का होता. घरी पणत्या लावलेल्या पाहिल्या, दिवाळीचा फराळ त्यांनी आम्हाला दिला. आम्हाला फारच आनंद झाला. दिवाळी यावेळी हुकली नाही याचे ते समाधान होते.
भारतीय क्रिकेट संघांसोबत सुमारे एक दशकभर मॅस्युअर म्हणून कार्यरत असलेल्या माने काकांचे अनुभव तर भन्नाट आहेत. माने काका म्हणत होते, आम्ही संघातील खेळाडू, व्यवस्थापन स्वत:च दिवाळी साजरी करायचो. खेळाडू, त्यांच्या ओळखीचे लोक खाण्याचे पदार्थ घेऊन यायचे. खेळाडूंकडे स्वत:कडेही दिवाळीचे पदार्थ असतात. टिमचे मॅनेजर देखील या गोष्टींचे आयोजन करायचे. फटाके फोडायचो. दिवे लावायचो. खाणे व फटाके उडविणे हा आनंदाचा, सेलिब्रेशनचा भाग होता.
सचिननेही एकदा संघासाठी दिवाळी सेलिब्रेशन आयोजित केले होते. एका टेरेसवर पणत्या लावण्यात आल्या होत्या. फटाके फोडले गेले होते. गोड-धोड खाणे झाले. भारतीय दूतावासात आम्ही स्वातंत्र्यदिन साजरे केले आहेत. अन्य समारंभही आयोजित व्हायचे. मात्र कोणत्याही दूतावासात दिवाळी साजरी करण्याचा योग कधी आला नव्हता.
दिवाळी हा सण भारतात प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या रंगात-ढंगात साजरा होतो. पण महाराष्ट्राच्या फराळाची चवच अन्य कुणाला नाही. महाराष्ट्रीयन पद्धतीचा फराळ फक्त महाराष्ट्राशी निगडीत लोकांकडेच मिळतो. त्यामुळे क्रिकेटपटूंना दौऱ्यादरम्यान महाराष्ट्रीयन कुटुंब कुठे भेटले की तेथे साजरी होणारी दिवाळी खास आगळीवेगळी असते.
याबाबत दस्तुरखुद्द सुनील गावसकर यांनी सांगितलेला आपला एक अनुभवच ऐका. गावसकर सिडनी येथे गेले की श्री शिरोडकर यांच्या आईंना भेटायचे. त्यांना त्या सिडनीच्या आजी म्हणायचे. या सिडनीच्या आजीच्या हातची चव अप्रतिम आहे असे म्हणायचे. या सिडनीच्या शिरोडकर आजींच्या फराळाची चव चाखण्यासाठी संपूर्ण सिडनी शहरच त्यांच्या सिडनी येथील निवासस्थानी लोटायचे. अनेक राजकीय नेत्यांनी देखील या आजींच्या जेवणाचा आणि फराळाचा आस्वाद घेतलाय.
अलिकडच्या काळात परदेशात वास्तव्य करणाऱ्या भारतीयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दुबई, यासारख्या ठिकाणी सामने असताना दिवाळीचा मनमुराद आनंद लुटता येतो. महेंद्रसिंग धोनीच्या पत्नीने साक्षीने मुलीसोबत दिवाळी साजरी करतानाचे फोटो अलिकडेच इन्स्ट्राग्रामवर टाकले होते. न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, शिवरामकृष्णन यांनी भारतवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. बरेचसे भारतीय क्रिकेट समालोचक आणि काही परदेशी माजी क्रिकेटपटू जे समालोचनाचे काम करतात, त्यांनाही दिवाळी दरम्यान आपण भारताच्या पारंपारिक गणवेशात नेहमीच पाहतो.
मुंबई इंडियन्सचा क्रिकेटपटू वेस्ट इंडियन कायरन पोलार्ड याने आपला मुलगा व मुलीने व स्वत:चे भारतीय वेशात दिवाळी साजरी करतानाचे फोटो सोशल मीडियावर टाकले होते. डेल स्टेन व मॉने मॉर्कले या दोन आफ्रिकन फास्ट बॉलर्सनी दिवाळी आपल्या मित्रांसोबत साजरी करतानाचे फोटो वायरल केले होते.
गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानवर भारताने विजय मिळविला, त्यावेळी भारतात दिवाळी साजरी होत होती. याआधी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली जेव्हा भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका ऑस्ट्रेलियात जिंकली होती. तेव्हाही ऑस्ट्रेलियातील भारतीयांसमवेत दिवाळीचा आनंद क्रिकेटपटूंनी लुटला होता. त्यानंतर भारतात परतल्यानंतरही वेगळे सेलिब्रेशन करण्यात आले होते.
झहीर खानने दिवाळीबाबतचा अनुभव सांगताना म्हटले, ‘आम्ही श्रीरामपूरला दिवाळी जोरात साजरी करायचो. माझे सर्व मित्र, त्यांच्या घरी फराळाला जायचो. परदेशात असतानाही अनेक भारतीय कुटुंबांनी भारतीय सणांचे असेच अनुभव आम्हाला दिले आहेत. त्यांना सर्वांना, आम्ही दिवाळी किंवा तत्सम सणांचे आनंद ‘मिस’ करू नये असे वाटायचे.’
जगभरात कुठेही भारतीय क्रिकेटपटू गेले, तेथे सर्वच भारतीय खेळाडूंना असेच अनुभव आले आहेत. खेळाडूच काय समवेत असणाऱ्या सर्वच जणांना पाहुणचार मिळतो.